चंद्रपूर : चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील लोहारा येथून ३० डिसेंबर २०२४ रोजी दोघांना चार वाघनखांसह अटक करण्यात आली होती. पाच आरोपींना अटक करून त्यांची वनकोठडी घेतली होती. तर तिघे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. चौकशीत फरार आरोपी मोरेश्वर जिटुजी कुमरे (रा. पेंढरी) याच्या घरझडतीत नीलगाय, चितळाची शिंगे तसेच वाघाची हाडे आणि तुटलेले दात हस्तगत करण्यात वन विभागाला यश आले आहे.
लोहारा येथून संदीप हरी तोडासे व शेखराम किसन कुळमेथे यांना सर्वप्रथम अटक करण्यात आली. वनकोठडीत त्यांनी पुन्हा पाच जणांची नावे घेतली. यामध्ये संतोष येमाजी कुळमेथे (रा. जानाळा, ता. मूल), दयाराम रामाजी मेश्राम (रा. पेटगाव, ता. सिंदेवाही), दिलीप श्रावण बावणे (रा. चिखली, ता. मूल), चतुर प्रल्हाद मेश्राम (रा. बेलगाटा, ता. मूल) व चांगदेव बालाजी आलाम (रा. बोर्डा, ता. चंद्रपूर) यांनाही अटक करून वनकोठडीत पाठविले. तिघांना पुन्हा वनकोठडी मिळविली, तर तिघांना न्यायालयीन कोठडी ठोठावली. तर एकाची जामिनावर सुटका झाली आहे.