भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्त्वाची आणि सर्वाधिक सामाजिक क्रिया आहे. साहजिकच अनेक शुभमुहूर्तांवर विवाह विधी केले जातात. यामध्ये बालविवाहही मोठ्या प्रमाणात केले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बालविवाह रोखण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने आदेश जारी केले आहेत. बालविवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि याविरोधात गुन्हा नोंदविला जातो. या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे बालविवाह रोखणे आणि बाल हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या क्षेत्रात बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि असे बालविवाह लक्षात आल्यास त्यावर तातडीने आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यासाठी बाल कल्याण समिती, पोलीस अधीक्षक, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी (बाल विकास प्रकल्प अधिकारी-शहरी व ग्रामीण, ग्रामसेवक) पोलीस पाटील, अंगणवाडी सेविकांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाला कळवावे. माहिती मिळताच तत्काळ बाल विवाह थांबविण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.
कोट
जिल्ह्यात बालविवाह कदापि होणार नाही, यासाठी नागरिकांना विविध साधनांद्वारे व्यापकस्तरावर माहिती देण्याचे कार्य सुरू आहे. त्यामुळे जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्ह्यात असे विवाह होत असतील अथवा तयारी सुरू असेल तर लगेच बाल संरक्षण कक्षाला कळवावे.
- अजय साखरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, चंद्रपूर