लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : काही राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी महानगरपालिका व नगरपालिका यातील बहुसदस्यीय पद्धतीला पसंती देऊन त्याचे समर्थन करीत आहेत. मात्र, जनता व मतदारांना ती पसंत नसून एकसदस्य पद्धतीलाच त्यांचे समर्थन असल्याचे दिसून येत आहे.
विद्यमान राज्य सरकारने भाजपच्या काळात लागू असलेली बहुसदस्य पद्धत रद्द करून एकसदस्य पद्धत अमलात आणण्याचे ठरवले होते. त्याकामी सर्व लागले होते. परंतु, आता मात्र महाविकास आघाडी सरकारने घूमजाव करीत बहुसदस्य पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत सर्व स्तरांतून वेगवेगळे मत प्रदर्शित होत आहे. त्यातून काही राजकीय पक्ष व नेते, त्यांची नेते मंडळी यांना बहुसदस्य पद्धत निवडून येण्यास सोयीची व काहींना ती अडचणीची वाटत आहे. मतदाते आणि सामान्य जनतेचे एकसदस्य पद्धत असावी, असे म्हणणे आहे. त्याचे कारण मतदात्यांनी एकसदस्यीय तसेच बहुसदस्यीय या दोन्ही पद्धती अनुभवल्या आहेत. वॉर्डाचा एक सदस्य असला की, त्याच्यावर असलेली जबाबदारी तो नेटाने पार पाडतो. बहुसदस्यीयमध्ये सदस्य जबाबदारी एकमेकांवर ढकलतात. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सदस्य निवडून आले की, त्यांचे राजकारण व हेवेदावे चालून वॉर्डाच्या विकासाला खीळ बसते. हा अनुभव मतदारांच्या गाठी असल्यामुळे एकसदस्य पद्धतच योग्य असेच मतदार म्हणतात. बल्लारपूर नगर परिषदेत सलग पाचदा नगरसेवकपदी निवडून आलेले, एकसदस्यीय आणि बहुसदस्यीय पद्धतीचा अनुभव गाठीशी असलेले काँग्रेसचे घनश्याम मूलचंदानी आणि शिवसेनेचे विनोद यादव अर्थात सिक्की हे याबाबत अनुभवातून सांगतात. राजकीय पक्षांना निवडून येण्याकरिता बहुसदस्यीय पद्धत सोयीची, तर मतदात्यांकरिता वॉर्डातील कामे होण्याकरिता एकसदस्यीय पद्धत उचित आहे. बल्लारपूर नगर परिषदेत विद्यमान सदस्य पद्धत (प्रत्येक प्रभागात दोन) शहरात कारभार बघत बसून पक्षीय बलाबल भाजपा १३, काँग्रेस १२, शिवसेना ३, अपक्ष १ असे आहे.