तालुका संघर्ष समिती : परिसरात काढली मोटार सायकल रॅली
शंकरपूर : शंकरपूर तालुक्याच्या मागणीसाठी शंकरपूर तालुका संघर्ष समिती व सर्व पक्षाच्या सहकार्याने बुधवारी तिसऱ्या दिवशीही संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवण्यात आली. परिसरातील गावांमधून शंकरपूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने मोटार सायकल रॅली काढण्यात आली. तर गावातील शेतकरी, शेतमजूर, महिला व पुरुषांनी स्वयफूर्तीने काम बंद ठेवून तालुक्याच्या मागणीकरिता हजारोंच्यावर संख्येने गावातून रॅली काढली. शंकरपूर तालुका निर्मितीसाठी शंकरपूर तालुका संघर्ष समिती व व्यापारी संघटनेतर्फे तीन दिवसीय बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी शंकरपूर येथील आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला व त्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळा, महाविद्यालये व संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवण्यात आली होती. तर तिसऱ्या दिवशी शंकरपूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत २०० च्या जवळपास मोटार सायकल चालकांनी भाग घेवून शंकरपूर तालुक्यात येणाऱ्या ३५ गावात रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून तालुका निर्मीती का आवश्यक आहे, याबाबत विवेचन करून जनजागृती केली. याप्रसंगी महिलांनी भजनाचा कार्यक्रम सादर करून शंकरपूर तालुका झालाच पाहिजे, अशा घोषणा देत संपूर्ण गावातून रॅली काढली व नवचैतन्य निर्माण केले. या रॅलीत अडीच ते तीन हजार महिला, पुरुषांचा सहभाग होता. माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर यांनी मार्गदर्शन करून मोटार सायकल रॅलीला समर्थन देत हिरवी झेंडी दाखविली. या रॅलीत जि.प. चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विजय टिपले, किशोर जयस्वाल यांनी मोटारसायकल रॅलीत सहभाग घेवून शंकरपूर तालुका निर्मितीबाबत गावागावात मार्गदर्शन केले. परिसरातील साठगाव, कोलारी, जवराबोडी, कवडशी (देश.), किटाळी, हिरापूर, आंबोली, चिचाळा (कुणबी) या गावांनी तालुका निर्मितीसाठी संपूर्ण गावात बंद पाडून तालुक्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. (वार्ताहर)