नवरगाव: येथील लसीकरण केंद्रावर गुरुवारी लस घेण्यासाठी नागरिकांची अचानक झुंबड उडाल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
मागील काही महिन्यांपासून नवरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक लोकसेवा शाळा येथे लसीकरण उपलब्धतेनुसार सुरू आहे. मात्र बऱ्याच लोकांच्या मनात लसीबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही नागरिकांनी लसीमुळे कोणताही फायदा नाही असे समजत बघ्याची भूमिका स्वीकारली होती. शिवाय हा परिसर ग्रामीण असल्याने शेतातील रोवणी, निंदण व इतर कामांमुळे लसीकरणाकडे दुर्लक्ष केले. मात्र हळुहळू लोकांच्या मनातील भीती कमी होत असून आणि सध्या या परिसरात शेतीची कामे नसल्याने बरेच नागरिक लस घेण्यासाठी सकाळी ८ वाजतापासूनच केन्द्रावर उपस्थित होते. परंतु शाळेचे गेट बंद असल्याने गर्दी वाढतच गेली. सकाळी १० वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कर्मचारी व इतर कर्मचारी आले असता गेटमध्ये नागरिकांची धक्काबुक्की सुरू झाली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वातावरण शांत करण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
090921\img_20210909_121146.jpg
लस घेण्यासाठी नागरीकांची अशी गर्दी केली होती