फोटो
नागभीड : येथील पंचायत समिती परिसरातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचण्यासाठी नागभीड नगर परिषदेवर धडक दिली.
नगर परिषद नागभीडच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र येऊन यावेळी नगर परिषदेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी घोषणाही दिल्या गेल्या. यानंतर मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यासाठी गेले असता मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने प्रशासकीय अधिकारी लोंढे यांना निवेदन देऊन समस्यांवर चर्चा करण्यात आली. पंचायत समिती परिसरामध्ये प्राथमिक सुविधा पुरेशा नाहीत. या परिसरातील मंदिरालगत जवळपास ३५०० चौ. फुटाची मोकळी जागा लेआऊटधारकाने नगर परिषदेला विकास करण्यासाठी हस्तांतरित केली. जेणेकरून परिसरातील वयोवृद्ध नागरिक, तसेच लहान मुलांना या जागेवर मैदान तयार करता येईल. मात्र, नगर परिषदेने विकास तर सोडाच कंपाउंडसुद्धा या जागेवर केले नसल्यामुळे खासगी बांधकामधारक या जागेचा वापर गिट्टी, रेती, विटा ठेवण्यासाठी करीत आहेत. रात्री-बेरात्री अवजड मालवाहू वाहने या ठिकाणी येत असल्यामुळे ही पूर्ण जागा चिखलमय झाली आहे. बऱ्याचदा अवजड वाहनांमुळे परिसरातील विजेची जिवंत तार तुटून रस्त्यावर पडून परिसरातील वीज जाते.
या प्रभागात रिकामे भूखंड अनेक वर्षांपासून पडीक असून, त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे, तसेच अतिवृष्टीमुळे भूखंडात पाणी साचून राहत असल्याने सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा त्रास होत आहे. ही बाब यावेळी न.प.च्या लक्षात आणून देण्यात आली. याशिवाय रस्त्यावर अतिक्रमण, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते दुरुस्ती, प्रदूषण यावरही लक्ष वेधण्यात आले. उपाध्यक्ष गणेश तर्वेकर यांच्या दालनात प्रत्यक्ष भेटून समस्यांवर लक्ष वेधले असता तर्वेकर यांनी नगर परिषदेला येणाऱ्या व थांबलेल्या निधीचा पाढा वाचला. यावेळी मनोज लडके, श्रीकांत पिसे, अनमूलवार, ठाकरे, समर्थ, उरकुडे, आशिष मिसार, आशिष बावनकर, दांडेकर, आटमांडे, सचिन देशमुख, कैलाश बोरीकर, अमोल देशमुख, बोरकुटे, मेंढे, योगेश वाढई, अजय वरखडे, गेडेकर, जांभूळकर, नागोसे, फटिंग, अर्चना समर्थ, दांडेकर, अनिता बोरकुटे, संगीता लडके, नागापुरे, विद्या मोरांडे, सुवर्णा टिपले आदी उपस्थित होते.