मनपाचे दुर्लक्ष: नगरसेवकांवर नागरिकांचा संताप
चंद्रपूर : महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या तुकूम प्रभाग क्रमांक १ मधील महेशनगर परिसरामध्ये पाईप लाईन टाकण्यासाठी चार महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा खोदण्यात आला. मात्र तो बुजविण्यात न आल्याने अपघाताची शक्यता होती. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे सदर खड्डा अपघाताला आमंत्रण देत होता. यासंदर्भात नागरिकांनी महापालिका तसेच प्रभागातील नगरसेवकांना सांगितले. मात्र काहीच उपयोग झाला नाही. शेवटी नागरिकांनी स्वत: हातात पावडे घेत सदर खड्डा बुजविला. या प्रकारामुळे मात्र स्थानिक नगरसेवकांवर नागरिक चांगलेच संतापले.
महेशनगर परिसरातील संतोष तेलंग, वासेकर आणि श्याम हेडाऊ यांच्या घरासमोरील सिमेंट रोड फोडून नळाची पाईप लाईन टाकण्यासाठी चार महिन्यांपूर्वी एक मोठा खड्डा खोदण्यात आला.
पाईपलाईनचे काम झाले नाही, मात्र खड्डा चार महिन्यांपासून तसाच होता. यामुळे अपघाताची शक्यता होती. यासंदर्भात येथील नागरिकांनी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, अनिल फुलझेले, शीला चव्हाण, माया उईके यांना खड्डा बुजविण्यासंदर्भात अनेकवेळा सांगितले. मात्र कोणीही याकडे गांभीर्याने घेतले नाही. दरम्यान, तीन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली. यामुळे या खड्ड्यामध्ये अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता येथील रहिवासी आडे, संतोष तेलंग, पिंटू वासेकर, कोसूरकर, बंडूभाऊ आणि श्याम हेडाऊ यांनी श्रमदान करून हा खड्डा बुजविला. त्यामुळे भविष्यात या खड्ड्यामुळे होणारी दुर्घटना टळली. नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे मात्र या परिसरातील नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला.