उकाड्यामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : जुलै महिना संपला असला तरी यावर्षी उकाडा कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी अद्यापही कूलर, एसी बंद केले नसून बहुतांश घरांत वापर सुरूच आहे. मागील आठवडाभरापूर्वीपासून अध्येमध्ये पाऊस कोसळत आहे. मात्र, उकाडा कमी झाला नसल्याने घामाघूम होत आहे.
धान्य मिळत नसल्याने संताप
चंद्रपूर : शासनाने प्रत्येक केशरी रेशनकार्डधारकांना धान्य पुरवावे, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, अन्नसुरक्षा तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत असलेल्या कार्डधारकांना मोफत धान्य दिले जात आहे. कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या हातचा रोजगारही गेला आहे.
व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत
चंद्रपूर : मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही शाळा सुरूच झाली नसल्यामुळे कापड दुकानात गर्दी नसून व्यावसायिकांमध्ये चिंतेचे सावट आहे. दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर गणवेश खरेदी करण्यासाठी कापड दुकानात गर्दी बघायला मिळत होती. यावर्षी कापड व्यावसायिक अजूनही ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे.
हाॅटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात हाॅटेल व्यावसायिक आहे. मात्र, कोरोना संकटामुळे त्यांचा व्यवसाय कमी होत आहे. लग्न समारंभ तसेच अन्य कार्यक्रमांत उपस्थित राहण्यावर प्रतिबंध आल्यामुळे पाहिजे तसा नफा मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
वाहतूक समस्या सोडवा
चंद्रपूर : जिल्ह्यात आता दारू दुकाने सुरू झाली आहे. त्यामुळे परवाना मिळालेल्या व्यावसायिकांनी आपापली दुकाने सुरू केली आहे. मात्र, काही दारू दुकानांजवळ वाहनतळच नसल्यामुळे ग्राहक रस्त्यावरच आपले वाहन ठेवत आहे. त्यामुळे इतरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पाण्याचे नमुने तपासावे
चंद्रपूर : शहरात काही ठिकाणी पाणी एटीएम मशीन सुरू करण्यात आली आहे. या मशीन बचत गट तसेच सामाजिक संस्थांद्वारे चालविल्या जात आहे. यामुळे नागरिकांना सुविधा मिळाली आहे. मात्र, पाणी नियमित तपासले जाते की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे नियमित पाणी तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जनावरांचे लसीकरण करावे
चंद्रपूर : जिल्ह्यात पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. पावसाळ्याच्या दिवसांत या पशूंवर विविध आजारांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्यात मुख्यत्वे दूषित पाणी, डास, हवेतील आर्द्रता यामुळे जनावरांमधील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे विविध आजार उद्भवत असतात. यावर आळा घालण्यासाठी पशू विभागाने लसीकरण मोहीम राबविणे गरजेचे आहे.
रेडियम नसल्याने अपघाताची शक्यता
चंद्रपूर : सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक रस्त्यावर रेडियम लावल्यास, अपघाताला आळा घालणे शक्य होणार आहे.
चिखलामुळे शेतात जाणे झाले कठीण
चंद्रपूर : ग्रामीण भागातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यातच पावसामुळे रस्त्यावर चिखल असल्यामुळे शेतकऱ्यांना येथून जाणे कठीण झाले आहे. काही शेतकऱ्यांनी कुंपण केल्यामुळे बैलबंडीला घेऊन जाणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्वच गावांतील पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली जात आहे.
मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा
चंद्रपूर : शहरातील मोकाट कुत्रे तसेच जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले. बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आठवडाबाजार अद्यापही बंदच
चंद्रपूर : जिल्ह्यातील आठवडाबाजार अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासनाने नियम तसेच अटी लादून आठवडाबाजार सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. वेगवेगळ्या दिवशी जिल्ह्यात आठवडाबाजार भरत होते.
शेतकऱ्यांची कृषी केंद्रात गर्दी
चंद्रपूर : येथील कृषी केंद्रामध्ये रासायनिक खत तसेच इतर कृषी साहित्य घेण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहे. मात्र, गावातील बस बंद असल्यामुळे त्यांना ऑटो तसेच इतर वाहनांनी शहरात यावे लागत आहे.
तिसऱ्या लाटेची भीती कायम
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सध्या कमी झाले असले, तरी तिसऱ्या लाटेची भीती आहे. जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी स्वच्छता पाळणे गरजेचे आहे.
वाहनांमुळे नागरिकांना त्रास
चंद्रपूर : येथील गोलबाजार तसेच भाजीबाजारामध्ये काही व्यावसायिक तसेच ग्राहक वाट्टेल तिथे आपले वाहन पार्क करीत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
फुलझाडांची मागणी वाढली
चंद्रपूर : शहरात विविध ठिकाणी फुलझाडे विक्रीसाठी आले आहे. नागपूर रोड तसेच मूल रोडवर नर्सरीसुद्धा आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने येथून फुलझाडे विकत घेत आहे. सध्या या व्यवसायात तेजी आली आहे.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा
चंद्रपूर : जंगल परिसरातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांनी विविध योजनांद्वारे शेतकुंपण तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खासगी शिक्षकांच्या समस्या सोडवा
चंद्रपूर : खासगी शाळांद्वारे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असला तरी शिक्षकांना पूर्ण वेतन दिले जात नसल्यामुळे ते अडचणीत सापडले आहे. या शिक्षकांकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची शेतकऱ्यांना मदत
चंद्रपूर : शाळांना सुटी असल्यामुळे विद्यार्थी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले असून रोवणीच्या कामात मदत करीत आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. सध्या रोवणीचे काम सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्यामुळे ते चिंतेत आहे.