पळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील ताडोबा बफर क्षेत्रातील पळसगावात अंधश्रद्धा व भीतीपोटी कोरोनाची लस घेतली जात नाही. पळसगावाची लोकसंख्या २५०० इतकी आहे. त्यापैकी केवळ १३ जणांनीच लस घेतली आहे. लस घेतल्यास मृत्यू होतो, अशी भीती येथील नागरिकांमध्ये आहे. प्रशासनाने या गावात लसीकरसाठी अनकेदा दवंडी पिटली. परंतु त्याचा कोणताच फायदा झाला नाही. या गावात आरोग्य विभागाने अनेकदा पाठपुरावा केला, परंतु त्यात केवळ १३ लोकांनीच लस घेतली आहे. उर्वरित नागरिकांनी लस घेण्यास नकार दिला. तालुक्यातील इतर आदिवासी बहुल गावांत अशीच स्थिती असल्याची धक्कादायक माहिती आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मोठा आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. चिमूर तालुक्यात एकूण ९५ गावांत कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे प्रशासन व आरोग्य विभागात एकच खळबळ माजली. कोरोनापासून बचाव करताना आरोग्य विभागाने प्रत्येक गावात लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले आहे. कोरोना समितीने लसीमुळे मृत्यू होत नसून लस घेतल्याने कोरोनापासून बचाव होतो, असे समजावून सांगितले. परंतु त्यानेही लोकांचे मत परिवर्तन झालेले दिसत नाही. आरोग्य सेविका, आशा वर्कर यांनी घरोघरी जाऊन लोकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही यश आले नाही. लसीकरण करण्याकरिता आता जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.