बाळूभाऊंचे पार्थिव पाहून नागरिकांचे अश्रू अनावर; अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2023 09:25 PM2023-05-30T21:25:08+5:302023-05-30T21:27:38+5:30

Chandrapur News अल्पावधीत राजकीय क्षेत्रात ठसा उमटविणारे खासदार बाळू धानोरकर या लाडक्या लोकनेत्याचे पार्थिव मंगळवारी दुपारी वरोरा येथील निवासस्थानी आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी झाली.

Citizens shed tears after seeing Balubhau's body; Alot crowd for funeral | बाळूभाऊंचे पार्थिव पाहून नागरिकांचे अश्रू अनावर; अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी

बाळूभाऊंचे पार्थिव पाहून नागरिकांचे अश्रू अनावर; अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी

googlenewsNext

प्रवीण खिरटकर

चंद्रपूर : अल्पावधीत राजकीय क्षेत्रात ठसा उमटविणारे खासदार बाळू धानोरकर या लाडक्या लोकनेत्याचे पार्थिव मंगळवारी दुपारी वरोरा येथील निवासस्थानी आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी झाली. चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्रातील हजारो नागरिक अत्यंत खिन्न मनाने भाऊंच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत वरोऱ्यात दाखल होत असल्याचे दिसून आले. लोकसेवेचे राजकारण करत असताना त्यांनी तरुणाईला आपलेसे केल्याने अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. बुधवारी शासकीय इतमामात भाऊंना अखेरचा निराेप देण्यात येणार असून, वरोरा बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे.

शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता ते काँग्रेसचे खासदार इथपर्यंतची त्यांची कारकीर्द ही युवकांच्या गळ्यातील ताईत बनली होती. २००३ मध्ये बाळू धानोरकर हे किसान सेनेचे चंद्रपूर जिल्ह्याचे पहिल्यांदा उपजिल्हाप्रमुख झाले. २००६ मध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी आली. या काळात त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला. २०१४ मध्ये आमदार ते खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द बहरत होती. पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचीही साथ मिळाल्याने हे दाम्पत्य राज्यभरात लक्षवेधी ठरत असतानाच काळाने घात केला. दुपारी बाळूभाऊंचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचा शोक अनावर झाला. रात्री उशिरापर्यंत अंत्यदर्शनासाठी येणाऱ्यांची रिघ लागली होती. बुधवारी ३१ मे रोजी वणी-वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होईल, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांनी दिली.

तरुणांच्या गळ्यातील ताईत

युवा व खेळाडूंसाठी कबड्डी स्पर्धा, योगमंडळे, व्यापारी संघ, खेळाडू प्रशिक्षक व क्रीडा अकादमी यातून तयार झालेले संबंध कायम जपून ठेवण्यासाठी खासदार बाळू धानोरकर हे अहोरात्र युवा कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहात होते. कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांशी त्यांचा संवाद होता. महिलांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमांचाही मोठा लाभ झाला. त्यामुळे कालपर्यंत हसतमुख राहणाऱ्या बाळूभाऊंचे अचानक पार्थिव पाहून अनेकांनी हंबरडा फोडला.

ज्येष्ठ नेत्यांनी घेतले अंत्यदर्शन

मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, जिल्ह्याचे पालकमंत्री, माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार, माजी पालकमंत्री शोभाताई फडणवीस, आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, मनसेचे राजू उंबरकर आदींसह हजारो नागरिकांनी खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन धानोरकर कुटुंबियांचे सांत्वन केले.

Web Title: Citizens shed tears after seeing Balubhau's body; Alot crowd for funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.