चंद्रपूर : केंद्र शासनाने सर्व आर्थिक व्यवहारात पारदर्शकता यावी, यासाठी नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या डिजीधन मेळाव्यात बोलताना केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अग्रणी बँकेचे रामटेके, इतर बँकाचे व्यवस्थापक, व्यापारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, चलनांचा वापर न करता कॅशलेस व्यवहार करण्याकरिता बँकानी नागरिकांना प्रवृत्त करावे. तसेच व्यापाऱ्यांना व लहान मोठया दुकानदारांना पिओएस मशिनचा अथवा चेक व डेबीट कार्ड यासारख्या विविध इलेक्ट्रानिक माध्यमांचा वापर करण्यास सांगावे. यामुळे चलनी नोटाही व्यवहारात कमी प्रमाणात लागतील, आणि प्रत्येकास व्यवहारासाठी पुरेशी रोख उपलब्ध होईल. भविष्यात कॅशलेस व्यवहाराने रोख रक्कमेची आवश्यकताही भासणार नाही. यामुळे प्रत्येकाचे आर्थिक व्यवहार सुरळीत तर होतीलच.याकरीता सर्वांनी मोठया संख्येने नागरिकांमध्ये जनजागृती करुन कॅशलेस व्यवहार करण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सांगितले. मेळाव्यात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पिओएस मशिनचे वाटपही दुकानदारांना करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करावे - सलील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2017 12:25 AM