चंद्रपूर : येथील जगन्नाथ बाबा नगरातील दारू दुकानावरून वाद पेटत असताना बुधवारी दत्त नगरमध्ये सुरू झालेल्या दारू दुकानावरून नागरिक चांगलेच संतापले. दरम्यान, नगरसेवक पप्पू देशमुख यांनी पहिल्याच दिवशी दुकान बंद पाडले, तर येथील दारूचे दुकान बंद करण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मात्र, दोन्ही दारूच्या दुकानांवरून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महापौर राखी कंचर्ला वार आणि नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दुकान सुरू होण्यापूर्वीच तक्रार का केली नाही, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहे.
जनभावना लक्षात घेता, देशी दारूचे दुकान तत्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांना निवेदन दिले. यावेळी सभागृह नेता देवानंद वाढई यांच्यासह अभिजीत मोहगावकर, अमित पुगलीया, डॉ. राम भारत, नीलेश लोणारे, साजिद मिर्झा, शाहरूख मिर्झा यांची उपस्थिती होती.
चंद्रपूरच्या दत्तनगर येथील महालक्ष्मी कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये सुरू झालेल्या देशी दारू दुकान सुरू होताच बुधवारी सकाळी दुकानाचे उद्घाटन झाल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. नागरिकांनी तातडीने नगरसेवक देशमुख यांना बोलावून दुकान बंद पाडले. त्यानंतर दुकान मालकांनी पोलिसांना पाचारण केले. परंतु नागरिकांनी पोलिसांसमोर ठाम भूमिका घेतल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून दुकान बंद ठेवण्याचे निर्देश पोलिसांनी दिले. यावेळी जनविकास युवा आघाडीचे अक्षय येरगुडे, विशाल बिरमवार यांच्यासह स्थानिक नागरिक अमित पुगलिया, डॉ. राम भारत, नितीन झाडे, साजिद मिर्झा, अभिजीत मोहगावकर, नीलेश लोणारे, शंकर अग्रवाल, सचिन लोणारे, बालसरे, पांडे, आमटे, सलीम शेख आदी उपस्थित होते.
निवासी इमारतीत वाणिज्य वापर
एखाद्या दुकान किंवा इमारतीमध्ये व्यवसाय सुरू करायचा असल्यास त्या इमारतीला किंवा दुकानाला वाणिज्य वापराची मंजुरी स्थानिक प्राधिकरणाकडून घेणे आवश्यक असते. दाताळा रोडवरील प्रवीण जुमडे तसेच नागपूर रोडवरील बाळा सम्मनवार व महादेव ढेंगळे यांच्या इमारतींना केवळ निवासी बांधकामाची मंजुरी असतानाही देशी दारूचे दुकान स्थानांतरित करण्याकरिता परवानगी दिल्याचे पप्पू देशमुख यांनी म्हटले आहे. याबाबतची तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.