चंद्रपूर: रिलायन्स जीओच्या केबल टाकणे व टॉवर्स उभारणे या संदर्भात मनपाने घेतलेल्या बैठकीत मनपाने काही आश्वासने दिली होती. मात्र याची पूर्तता न करताच रिलायन्स जीओला काम करू दिले. यामुळे संतप्त होत प्रहारच्या नेतृत्वात नागरिकांनी रिलायन्स जीओचे महाकाली मंदिराजवळ सुरू असलेले काम बंद पाडले.रिलायन्स जीओला भूमिगत केबल टाकण्यासाठी परवानगी देणे, टॉवर्स उभारण्यासाठी मंजुरी देणे, याबाबत महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्येच वाद सुरू आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांनी आमसभेत दिलेल्या मंजुरीला मनपातीलच सत्ताधारी काँग्रेस व भाजपाच्या नगरसेवकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. यासाठी चंद्रपूरचे बंदचे आंदोलन करीत मोर्चाही काढण्यात आला होता. यानंतर मनपातील पदाधिकाऱ्यांनी रिलायन्स जीओच्या कामाबाबत व परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सामाजिक संस्था, सुज्ञ नागरिक यांना पाचारण करून चर्चा केली. या चर्चेत अनेक सामाजिक संस्थांनी काही अटींची पूर्तता केल्यानंतरच परवानगी द्यावी, अशी भूमिका मांडली. त्यानंतर मनपा पदाधिकाऱ्यांनी याबाबत एक समिती गठित करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनानुसार अद्याप कोणतीच समिती गठित करण्यात आलेली नाही. मात्र रिलायन्स जीओचे खोदकाम शहरात सुरूच आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच संतापले आहेत.बुधवारी महाकाली मंदिराजवळील पेट्रोलपंपसमोर रिलायन्स जीओचे केबल टाकण्याचे काम सुरू होते. प्रहारचे जिल्हा सचिव इमरान रझा यांच्या नेतृत्वात नागरिकांनी हे काम बंद पाडले. (शहर प्रतिनिधी)
नागरिकांनीच काम बंद पाडले
By admin | Published: July 10, 2014 11:30 PM