वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी
चंद्रपूर : रामनगर-दाताळा परिसरात वाहतूक वाढल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. या रस्त्यावर अनेक शाळा असल्याने सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रामनगर चौकात वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पंचायत राज प्रशिक्षण द्यावे
चंद्रपूर : ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेला केवळ निवडक ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित राहत असल्याचे वास्तव्य बहुतांश ठिकाणी पहायला मिळते. त्यामुळे ग्रामसभेला पंचायत राज पद्धतीची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण शिबिर राबवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अवैध वाहतुकीला आळा घाला
चंद्रपूर : शहरापासून तालुकास्थळी जाणाऱ्या विविध मार्गांवर अवैध वाहतुकीला ऊत आला आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना सतत घडत आहेत. अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अवैध प्रवासी वाहतूकदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित
चंद्रपूर : जिल्ह्यातील नगर परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वच्छता कामगारांची शैक्षणिक पात्रता असूनही त्यांना पदोन्नती देण्यात आली नाही. अनेकदा पदोन्नतीसाठी आंदोलन करण्यात आले; परंतु त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे अहर्ताधारक सफाई कामगारांची पदोन्नती करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
गडचांदूर: शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यामध्ये कुत्रे उभे राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले. नगर परिषदने मोकाट जनावरे व डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.
बाजारातील अतिक्रमण काढण्याची मागणी
चंद्रपूर : गोल बाजार सर्वाधिक गजबजलेला परिसर आहे. या ठिकाणी व्यावसायिकांची मोठी चाळ आहे. याशिवाय येथे दररोज भाजीबाजारही भरतो. पूर्वी गोलबाजारात गांधी चौकापर्यंत जाण्यासाठी मोठा रस्ता होता; मात्र सध्या व्यावसायिकांनी या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद होऊन या रस्त्यावरून वाहन काढताना त्रास होत आहे. संबंधित विभागाने ही समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कोरपना-वणी
बससेवेची मागणी
कोरपना : कोरपना व वणी येथून सायंकाळी बसफेरी नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. वणी शहर या परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. परिणामी, शेकडो नागरिक ये-जा करतात. शिवाय या मार्गावरील लालगुडा, वाघदरा, मंदर, केसुर्ली, चारगाव चौकी, शिरपूर, कुरई, आबई, वेळाबाई, ढाकोरी बोरी, मूर्ती आदी गावातील नागरिकांना बिच शेवटची बस आहे. त्यामुळे बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
वनसडी मार्गावर जीवघेणे खड्डे
कोरपना: वनसडी-भोयगाव-चंद्रपूर मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. यामुळे अपघाताची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची करण्यात आली आहे.
एटीएमची सुरक्षा वाढविण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील विविध भागांमध्ये बँकांनी एटीएम सेवा सुरू केली आहे. ग्राहक याचा लाभसुद्धा घेत आहे; मात्र काही ठिकाणी एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसू येत आहे. भविष्यात काही धोका झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.