सिंदेवाही : नियमाप्रमाणे भूमी अभिलेख कार्यालयातील फेरफार प्रकरणाची कामे २० ते २५ दिवसात करणे बंधनकारक असते. परंतु सिंदेवाही येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडून नियमाला तिलांजली दिली जात आहे. तीन ते चार महिने लोटूनही येथील फेरफार आणि आखीव पत्रिकेचे कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.
मालमत्तेसंबंधी कामे भूमी अभिलेख कार्यालयाकडे असतात. पूर्वी फेरफार किंवा आखीव पत्रिकेचे काम हे हस्तलिखित पद्धतीने करण्यात येत होते. परंतु आता ही कामे ऑनलाईन पद्धतीने होतात. आधी अडचणी येत होत्या. परंतु त्यानंतर ऑनलाईन प्रणालीत सुधारणा करण्यात आली. जेव्हा काम होण्यास सुरुवात झाली, तेव्हा येथील कार्यालयातील फेरफाराची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली झाली. परिणामी ही कामे ठप्प पडली आहेत. त्यांच्या ठिकाणी नवीन कर्मचारी रुजू होणार होते. ते काही दिवस सुटीवर गेल्याने नागरिकांची कामे पुन्हा खोळंबली आहेत. यासंदर्भात येथील अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.