तुकूम परिसरातील क्राईस्ट हाॅस्पिटलकडून महेशनगरकडे जाणाऱ्या तसेच होमगार्ड भवन परिसरामध्ये शहरातील विविध भागातील मजनू या परिसरात मोठ्या संख्येने येत आहेत. विशेष म्हणजे, एखाद्या झाडाखाली ते तासन् ्तास थांबतात. या परिसराच्या अगदी जवळच स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी विरंगुळा केंद्राची सुरुवात केली. या केंद्रामध्ये ज्येष्ठांसह लहान बालके मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येतात. मात्र होमगार्ड परिसरातील या मजनूंमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला लावून वाट्टेल ते चाळे मजनू करीत आहेत. या प्रकारामुळे ज्येष्ठांसह महिलांनाही खाली मान टाकून चालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या मजनूंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स
ऐकण्याची मनस्थिती नाही
काही नागरिक या मजनूंना समज देत त्यांना हटकतात. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसून ज्येष्ठांना वाट्टेल ते बोलून मोकळे होत आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी त्यांना हटकणेही सोडून दिले आहे. त्यामुळे होमगार्ड प्रशासन तसेच स्थानिक पोलिसांनीच मजनूंना धडा शिकवावा, अशी मागणी केली जात आहे.