चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून सातत्याने महागाई वाढत आहे. आता तर सिलिंडर ८६० रुपयांवर पोहोचला आहे. यासोबतच इतरही साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. महागाई कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
बाबूपेठ परिसरात घाणीचे साम्राज्य
चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: बाबूपेठ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी कचरा साचला आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी
चंदपूर : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रेडियम लावण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्यावेळी समोरील रस्ता दिसत नाही. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रत्येक रस्त्यावर रेडियम लावून अपघात टाळावा, अशी मागणी सहयोगी संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.
ग्राहकांची व्यावसायिकांकडून लूट
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवाच सुरू आहे. दरम्यान, येथील गोल बाजार तसेच गंजवार्डामध्ये मोठा भाजीबाजार भरतो. त्यामुळे नागरिक येथे भाजी घेण्यासाठी जातात. मात्र काही व्यावसायिक वजन कमी देत असल्याचा आरोप ग्राहक करीत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कली जात आहे.
धोकादायक चेंबर दुरुस्त करावे
चंद्रपूर : शहरात काही ठिकाणी उघडे चेंबर आहेत. हे चेंबर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. त्यामुळे दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
व्यावसायिकांचे रस्त्यावर अतिक्रमण
चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर मार्गावरील जनता काॅलेज चौक ते वडगाव फाट्यापर्यंत काही व्यावसायिक नव्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना विक्रीसाठी रस्त्यावर ठेवतात. त्यामुळे रस्ता मोठा असूनही अनेकवेळा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मोबाईलमुळे डोळ्यांचे आजार वाढले
चंद्रपूर : ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांना नाईलाजाने मुलांकडे मोबाईल द्यावा लागत आहे; मात्र त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. मुलांना डोळ्याचे आजार होण्याची शक्यता आहे. अनेकवेळा मुले अभ्यास कमी आणि मोबाईल इतरत्र कामासाठी वापरत आहेत. त्यामुळे त्याचे भविष्यात दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. पालकांनी वेळीच सतर्क होणे गरजेचे आहे.
चेंबर ठरताहेत धोकादायक
चंद्रपूर : शहरात काही ठिकाणी उघडे चेंबर आहेत. हे चेंबर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. त्यामुळे दुरुस्तीची मागणी केली जात आहे. काही महिन्यांमध्ये पावसाचे दिवस येणार आहेत. या दिवसामध्ये उघड्या चेंबरमुळे अपघाताची शक्यता आहे.
भंगार वाहनांचा लिलाव करावा
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील विविध कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार वाहने आहेत. मात्र या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली असून, येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथे जागा रिकामी करावी, अशी मागणी केली जात आहे.
एटीएम केंद्राची स्वच्छता करावी
चंद्रपूर : शहरात विविध बॅंकांनी एटीएम केंद्र सुरू केले आहे. काही एटीएमची नियमित स्वच्छता होत असली, तरी काही केंद्रात कचऱ्याचे ढिगारे बघायला मिळत आहेत. त्यामुळे या केंद्राची नियमित तपासणी करून ग्राहकांना दिलासा देणे गरजेचे आहे.
बांधकाम व्यावसायिक धास्तावले
चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले असून, शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. परिणामी बांधकाम व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
उड्डाणपुलावरील माती उचलावी
चंद्रपूर : शहरामध्ये चार ते पाच उड्डाण पूल आहेत. मात्र या पुलांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे पाहिजे तसे लक्ष नाही. परिणामी पुलावर मोठ्या प्रमाणात मातीचा थर साचला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहराचे विद्रुपीकरण सुरूच
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरातील चौका-चौकात मोठमोठे बॅनर लावले जात आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने यासंदर्भात कडक कारवाईचा निर्णय घेतला; मात्र तो निर्णय हवेतच विरला आहे.
कचरा संकलकांची संख्या वाढवावी
चंद्रपूर : शहरातील प्रत्येक प्रभागात घंटागाडीद्वारे कचरा संकलन केल्या जात आहे. मात्र काही वार्डातील संकलकांची संख्या कमी असल्यामुळे असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत आहे. कर्मचाऱ्यांची पाच वर्षांपूर्वी नियुक्ती करताना, त्यावेळची लोकसंख्या विचारात घेण्यात आली होती; मात्र आता लोकसंख्या वाढली असतानाही कर्मचारी संख्या मात्र तेवढीच आहे.
बेरोजगार संस्थांना हवे काम
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे प्रत्येकजण संकटात आले आहेत. यामध्ये बेरोजगार संस्थाही कामे नसल्यामुळे अडचणीस सापडल्या आहेत. त्यामुळे शासनाने या संस्थांनाही छोटे-मोठे काम देऊन त्यांना रुळावर आणावे, अशी मागणी केली जात आहे.
अतिक्रमण हटविण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषत: तुकूम, वडगाव, बंगाली कॅम्प आदी परिसरामध्ये अतिक्रमणधारकांची संख्या अधिक आहे.
टाॅवरची निर्मिती करावी
चंद्रपूर : शहरातील काही भागामध्ये भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची परीक्षा सुरू आहे. अशावेळी त्यांना कव्हरेजच मिळत नसल्याने ऑनलाईन अभ्यासक्रम कसा करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
चंद्रपूर : महापालिकेअंतर्गत येत असलेल्या काही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रात्री रस्त्यावर बसून असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. यावर आळा घालण्याची मागणी केली आहे.
नामफलक लावण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग, तालुका मार्ग, ग्रामीण मार्ग गेले आहेत; मात्र यातील बहुतांश रस्त्यांवर गावाच्या नावाचा फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असते. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवरील नाव दिसत नसल्याची स्थिती आहे.
वीजबिल भरणे झाले कठीण
चंद्रपूर : शहरातील काही भागातील नागरिकांना अव्वाच्यासव्वा वीजबिल येत असल्यामुळे ते भरणे कठीण झाले आहे. विशेषत: मागील लाॅकडाऊनपासून काहींनी वीजबिल भरलेच नाही. त्यातच आता पुन्हा लाॅकडाऊन होण्याची स्थिती आहे. त्यामुळे या नागरिकांवर यास्थितीत अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
अन्नपदार्थांची तपासणी करावी
चंद्रपूर : शहरातील काही भागामध्ये अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री केली जात आहे. सध्या कोरोना संकटामुळे हाॅटेलमध्ये बसून खाण्यावर प्रतिबंध आहे. त्यामुळे काही नागरिक पदार्थ पॅकिंग करून नेत आहेत. मात्र हातठेल्यावर उघड्यावरील पदार्थ दिले जात असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गतिरोधकाअभावी अपघाताची शक्यता
चंद्रपूर : चंद्रपूर ते दुर्गापूर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु बऱ्याच ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी या रस्त्यावर गतिरोधक निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी केली.
बेरोजगारांना काम द्या
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यातच कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. विविध कंपनीने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेत बेरोजगारांना सावरावे, अशी मागणी केली जात आहे.
पोलिसांचा भार कमी करावा
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात महापालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. शहराची लोकसंख्या व नगर विस्तार वेगाने वाढत आहे. त्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे शहरात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, वाहतूक पोलिसांच्या मंजूर असलेल्या जागांपेक्षा अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे अन्य पोलीस कर्मचाऱ्यांवर भार पडला आहे.