एटीएमध्ये सुरक्षा रक्षक नाही
चंद्रपूर : शहरात काही ठिकाणी एटीएम मशीन बसविण्यात आल्या. मात्र मागील काही दिवसांपासून पैशाचा ठणठणाट आहे. त्यातच सुरक्षा रक्षकही नसल्यामुळे एखादी घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आधार कार्ड काढण्यासाठी गर्दी
चंद्रपूर : ग्रामीण भागातील काही गावांतील नागरिकांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याने नागरिक आधार कार्ड काढण्यासाठी शहरात येत आहेत. ग्रामीण भागात शेतमजुरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्डची गरज असते. त्यामुळे आधार कार्ड नोंदणी केंद्र शोधताना सध्या नागरिक दिसत आहे. त्यामुळे गावागावात आधार कार्ड केंद्र सुरु करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नेटवर्कअभावी ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डामध्ये विविध कंपन्यांसह बीएसएनएलचेसुद्धा नेटवर्क नाही. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे. त्यातच ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नेटवर्क समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.
बेरोजगारांमध्ये नैराश्य वाढले
चंद्रपूर: जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार असून त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते नैराश्यात सापडले आहे. त्यामुळे या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी तसेच जिल्ह्यात अधिकधिक उद्योगाची निर्मिती करावी, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे.
फळांची मागणी वाढली
चंद्रपूर : रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विटामिन सी युक्त फळे खायला नागरिक पसंती देत आहेत. त्यातच आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्यामुळे सध्या बाजारपेठेत फळे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळत आहे.
मनपाच्या दुर्लक्षाने अतिक्रमण वाढले
चंद्रपूर : शहरातील गांधी मार्ग तसेच कस्तुरबा मार्गावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील सिस्टर कॅालनी परिसरात एक दिवसाआळ नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासते.
क्रीडा संकुल सुरु करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील क्रीडा संकुल बंद असल्याने युवकांना अडचण जात आहे. क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी संकूल सुरु करावे, अशी मागणी आहे. क्रीडा संकुलमध्ये व्यायमाचे साहित्य लावण्यात येत असल्याने हे केंद्र उघडणे गरजेचे आहे.
सिग्नल बंद असल्याने अपघाताची शक्यता
चंद्रपूर : येथील ट्रायस्टार हॉटेल चौक, पडोली चौक, मिलन चौक तसेच बाबूपेठ परिसरातील रस्त्यावरील सिग्नल बंद असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : जिल्ह्यात औष्णिक वीज प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पातून निघणाऱ्या धुरांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. प्रदूषणाच्या आळा घालण्याची मागणी केली आहे.
वीज खांबामुळे अपघाताचा धोका
चंद्रपूर : शहरातील काही चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध वीज खांब आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे खांब काढून दिलासा द्यावा,अशी मागणी केली जात आहे.
प्लास्टिकवर बंदी केवळ नावापुरती
चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. शहरातील गंजवॉर्ड, गोलबाजार, भिवापूर सुपर मार्केट व अन्य बाजाराच्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना दिल्या जात आहे. मात्र याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.