राजकुमार चुनारकर
चंद्रपूर : तालुक्यातील खंडाळा गावातील नागरिकांनी गावातील ज्यांची गुरे आहेत त्या सर्वांनी एकेक दिवस आळीपाळीने गुरे चारण्यासाठी जंगलात जाण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. खंडाळा गावातील गोधनांना मिळणाऱ्या चांगल्या चाऱ्यामुळे गोधनात वाढ झाली. शिवाय गोधन सुदृढ होऊन दुधामध्ये वाढ झाल्याचा दावा केला जात आहे. (The citizens of 'those' villages become one day cowherds)
चिमूरपासून अठरा किलोमीटर अंतरावर चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवर खंडाळा गाव असून लगत जंगलव्याप्त परिसर आहे. गावातील मुख्य व्यवसाय शेतीसह, दूध, दही, तूप विकून उपजीविका भागवणारी कुटुंबे आहेत. मात्र, दिवसागणिक गायींच्या राखणीत झालेली वाढ, न मिळणारे गुराखी यामुळे गावातील अनेकांनी गोधन विक्रीस काढले. यामुळे गावातील गोधनाची संख्या कमी झाली. याचा परिणाम दुधाच्या उत्पादनावर झाला होता.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित किशोर गुरले या युवकाने गावात गुरुदेवांच्या प्रार्थनेनंतर गोपालक शेतकऱ्यांसोबत चर्चा करून यावर उपाय शोधला. गावात असलेल्या गोमालकांनी आळीपाळीने गावातील सर्व गायी चरण्यासाठी जंगलात नेण्याचे ठरविले. या उपक्रमाला गावातील गोमालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आजघडीला ४० गोपालक आळीपाळीने गाई चारण्यासाठी जंगलात जातात. या उपक्रमात एका दिवशी दोन जणांची पाळी लावण्यात आली आहे. एखाद्याला त्या दिवशी काम असल्यास बदली व्यक्ती त्याचे काम करतो.
एक दिवसाचा गुराखी या उपक्रमामुळे गाई हरविणे, वाघाचे भक्ष्य बनण्यापासून रक्षण झाले आहे, सोबतच गायींना पोटभर चारा मिळण्यास मदत झाली तर महिन्याकाठी राखणदारीचा खर्चही वाचला. या उपक्रमात ४० कुटुंबे सहभागी झाली आहेत. यामुळे गोधनाच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. एक दिवसाचा गुराखी उपक्रम तालुक्यातील केसलाबोडी व वर्ध्यातील ताडगाव या गावांत सुरू करण्यात आला आहे.
एक दिवसाचा गुराखी या संकल्पनेमुळे गावातील गोपालकांच्या महिन्याच्या राखणीच्या पैशात बचत झाली, गुरांची काळजी दूर होऊन गावातील गोधनात वाढ झाली आहे.
किशोर गुरले, गोपालक, खंडाळा, ता. चिमूर