चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील एकमेव असलेल्या रामाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शहरातील इतर तलाव यापूर्वीच नष्ट झाले. त्यामुळे किमान रामाळा तरी वाचविणे गरजेचे आहे. यासाठी रामाळा संरक्षण आणि संवर्धनासाठी आता रामाळा तलाव संरक्षण संघटना स्थापन करण्यात आली आहे. ही संघटना रामाळा तलावाच्या संरक्षण, संवर्धनासाठी काम करणार आहे. विशेष म्हणजे, रामाळा तलाव परिसरात ४२ टक्के अतिक्रमण झाल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीप्रसंगी सांगितले.
यासंदर्भात श्रीलक्ष्मीनारायण मंदिराच्या सभागृहात नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी या ऐतिहासिक तलावाचे संरक्षण झाले नाही तर हा तलाव लवकरच इतिहासजमा होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे तलावाच्या संरक्षणासाठी एकजूट होऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी करावी, असे आवाहन उपस्थितांनी व्यक्त केली.
रामाळा तलावाचे संरक्षण करण्यासाठी संघटनेने चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालिवाल यांना निवेदन दिले. यासंदर्भात चर्चा करण्यात आली आल्याचे संयोजक प्रा. डाॅ. योगेश दुधपचारे यांनी दिली. आभार मुरलीमनोहर व्यास यांनी मानले.
यांची होती उपस्थितीयावेळी प्रा. डॉ. जुगलकिशोर सोमाणी, माजी नगरसेवक पप्पू देशमुख, ॲड. राजेश विराणी आदींनी विचार मांडले. याप्रसंगी सीए दामोदर सारडा, मुकुंद गांधी, दिनेश बजाज, मदनगोपाल पांडीया, कुणाल देवगिरीकर, ॲड. योगेश पचारे, दामोदर मंत्री, श्यामलाल बजाज, शैलेश बागला, पंकज शर्मा, दीपक सोमाणी, सुधीर बजाज, चुडामण पिपरीकर, मनोज जुनोनकर, नितीन रामटेके, संदीप बजाज, पतरंगे, ॲड. योगिता रायपुरे आदींसह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पाच तलावांचे अस्तित्व नष्टचंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांना जिल्हा प्रशासनाने संरक्षित करून प्रदूषणमुक्त करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. चंद्रपूर शहरात पूर्वी गौरी तलाव, कोनेरी तलाव, घुटकाला तलाव, लेंढी तलाव, लाल तलाव हे पाच तलाव अस्तित्वात होते. पण, प्रशासन आणि जनतेने दुर्लक्ष केल्यामुळे या तलावांवर अतिक्रमण झाले आहे. आता एकमात्र रामाळा तलाव शिल्लक आहे. त्यावरही ४२ टक्के अतिक्रमण झालेले आहे.