फोटो
चंद्रपूर : महानगरपालिकेकडून राबविण्यात येणारी कचरा संकलन कंत्राट प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या पुढाकारातून सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
शहर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात आंदोलन पार पडले. त्यानंतर उपायुक्त विशाल वाघ यांना निवेदन सादर करण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकेने शहरातील घर ते घर कचरा गोळा करणे, कंपोस्ट डेपोपर्यंत कचरा वाहतूक करणे, नाली सफाईचा कचरा वाहतूक करणे या कामासाठी निविदा मागितल्या होत्या. या कामासाठी मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे या कंत्राटदाराचा १७०० रुपये प्रति मेट्रीक टन हा सर्वात कमी दर होता. त्यामुळे या कंत्राटदाराला दहा वर्षांसाठी कंत्राट मंजूर करण्यात आले. मात्र, नंतर मनपातील सत्ताधाºयांनी हे कंत्राट रद्द केले. त्यानंतर नवीन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. नवीन कंत्राटात मे. स्वयंभू ट्रान्स्प्रोर्ट या कंत्राटदाराने पुन्हा प्रति मेट्रिक टन २५५२ रुपये दराची निविदा सादर केली. ही निविदा सर्वात कमी दराची असल्याने या कंत्राटदारास स्थायी समितीने कंत्राट मंजूर केले आहे. मात्र, जुन्या आणि नवीन दरात तब्बल ८५० रुपयांची दरवाढ आहे. यामुळे मनपाला तब्बल कोटयवधी रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने स्वत: पुढाकार घेऊन सदर कंत्राट रद्द करून भविष्यात होणारा आर्थिक भूर्दंड वाचविण्यात यावा, अशी मागणी शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी निवेदनातून केली. आंदोलनात महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, महिला आघाडी शहराध्यक्ष सुनिता अग्रवाल, विनोद दत्तात्रय, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेवक निलेश खोब्रागडे, नगरसेवक अमजद अली, नगरसेविका विना खनके, नगरसेविका संगिता भोयर, नगरसेविका ललिता रेवेल्लीवार, सोहेल शेख, अश्विनी खोब्रागडे, प्रवीण पडवेकर, राजू रेवेल्लीवार, विजय चहारे, अनू दहेगावकर, प्रसन्ना शिरवार, मनीष तिवारी, उमाकांत धांडे आदी सहभागी झाले होते.