गडचिरोली-चंद्रपूर महामार्गावरून मूल शहरातून अनेक वाहनांची ये-जा सुरु असते. मात्र, या महामार्गावर जनावरे भररस्त्यावर बसून राहत असल्याने ये-जा करणाऱ्यांना वाहनाचा मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. कितीही हाॅर्न वाजवला तरी ते मार्गावरून हटण्यास तयार नसतात. अशातच भरधाव वाहन आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असते. या जनावरांमुळे ट्रॅफिक जाम होऊन दुचाकी व चारचाकीचे अपघात घडले आहेत. मूल शहरात डुक्करपालन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने संपूर्ण शहरात मोकाटपणे दिवसरात्र डुकरांचा हौदोस सुरू असतो. नाली, डबक्यात व रस्त्यावर सर्वत्र घाण करीत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांची लागण होत आहे. नगर परिषदेने संपूर्ण मूल शहरात ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून जाहीररीत्या जनावरे व डुकरे सांभाळण्याची जबाबदारी घ्यावी; अन्यथा नाइलाजास्तव जनावरे व डुकरांचा बदोबस्त करण्याची जबाबदारी स्वत: नगर परिषद घेऊन पुढील कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे. एकंदरीत नगर परिषदेने जनावरे व डुक्कर मालकांना अल्टिमेटमच दिला आहे.
यासंदर्भात नप अध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी चर्चा करून जनावरे मालकांना जाहीर सूचना देण्यात आली. या उपरही जनावरे रस्त्यावर दिसून आलेली ७५ जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकण्यात आली आहे, तसेच डुकरांनादेखील येत्या काही दिवसांत पकडून इतरत्र हलविले जाणार आहे. यासाठी नागपूरच्या एजन्सीला सांगण्यात आले आहे.
-अभय चेपुरवार आरोग्य निरीक्षक, नप मूल