नागभीड : नागभीड शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. शहराच्या भोवती अनेक वसाहती आकारास येत आहेत. या व्याप्तीसोबतच महत्त्वाचे अनेक बदल जाणवत आहेत.
नागभीडला तालुक्याचा दर्जा १९८१ मध्येच प्राप्त झाला असला, त्याचबरोबर नागभीड हे शहर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना मध्यवर्ती असले आणि या ठिकाणी इंग्रजकालीन रेल्वेचे जंक्शन असले तरी आठ-दहा वर्षांपूर्वीपर्यंत नागभीडची तुलना एका मोठ्या खेड्याशी केल्या जात होती आणि यात काही वावगेही नव्हते; पण आता नागभीडचे स्वरूप बदलत आहे. गेल्या आठ-दहा वर्षात नागभीडमध्ये अनेक बदल दिसत आहेत. नागभीड येथे नगर परिषद स्थापन झाल्यापासून या बदलाने गती घेतली आहे.
नागभीडमध्ये पहिली वसाहत पंचायत समिती परिसरात तयार झाली. त्यानंतर मुसाभाई नगर ही वसाहत अस्तित्वात आली. हळूहळू येथे अनेक वसाहती निर्माण झाल्या. अनेक वसाहती निर्माणाधिन आहेत. आता संपूर्ण नागभीडच्या भोवतीच वसाहती निर्माण होत आहेत. आता आदर्श काॅलनीचा मागील भाग, फ्रेंड्स काॅलनीचा मागील भाग, दूध शीतकरण केंद्राजवळील भाग, तुकूम रोड, बोथली रस्ता, नागपूर रोड या ठिकाणी निर्माणाधिन असलेल्या वसाहतीवरून हे लक्षात येते. नागभीडच्या काही वसाहतींमध्ये भूखंडांची किंमत प्रति चौरस फूट ६०० ते ७०० रुपये दराने सुरू आहे. दर्शनी भागात तर यापेक्षा जास्त दर असल्याची माहिती आहे. या वसाहतींमध्ये अनेक टोलेजंग इमारती शहरात उभ्या राहू लागल्या आहेत.
नागभीड शहराकडे एक नजर टाकली तर भिकेश्वर, तिव्हर्ला ही गावे नागभीड नगर परिषदेत समाविष्ट असली तरी दोन-अडीच किमी अंतरावर आहेत. आता येथूनच नागभीडची सुरुवात झाल्यासारखे वाटते. गेल्या आठ- दहा वर्षात अनेक नामांकित डाॅक्टरांनी आपले दवाखाने येथे सुरू केले आहेत. दर्जेदार शैक्षणिक सोयीही निर्माण झाल्या आहेत, यापूर्वी शहरात कर्तव्यावर असणारे बहुसंख्य कर्मचारी जवळच्या शहरातून यायचे; पण आता यात फरक जाणवू लागला आहे. पूर्ण जरी नाही, पण बहुतेक कर्मचारीवर्ग येथे वास्तव्य करून राहू लागले आहेत. यामुळे अर्थकारणात फरक जाणवत आहे.