वडाळा (तु.) : भद्रावती तालुक्यातील कोंढेगाव (माल) येथील ग्रामस्थांनी ३७१.६७ एकर वनजमिनीवर सामूहिक वनहक्क दावा केला आहे. सदर दावा मान्य करण्यास ग्रामसभेने मंजुरी दिली आहे. ग्रामसभेचे सचिव प्रशांत ताटेवार यांनी एका शिष्टमंडळाच्या उपस्थितीत हा दावा पुढील कारवाईसाठी उपविभागस्तरीय वनहक्क समिती वरोरा यांच्या कार्यालयात नुकताच सादर केला आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वनहक्क मान्य करणे अधिनियम २00६ व नियम २00८ आणि सुधारणा नियम २0१२ नुसार एकूण २९0 ग्रामस्थांनी निस्तार पत्रकातील नोंदीप्रमाणे ३७१.६७ एकर वनजमिनीवर सामूहिक वनहक्क दाव्याची मागणी केली होती. सदर दावा गावसमुहाने वनहक्क समितीकडे सादर केल्यानंतर ७ मे २0१३ रोजी सदर दाव्याच्या पडताळणी करण्याकरिता सभा बोलाविण्यात आली. त्या सभेच्या नोटीस तहसीलदार भद्रावती, वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) मोहर्ली, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) मोहर्ली, संवर्गविकास अधिकारी, तालुका निरीक्षक भुमिअभिलेख भद्रावती, ग्रा.पं. कोंढेगाव यांना पाठविण्यात आल्या होत्या. दाव्याच्या पडताळणीच्या वेळी दाव्यामध्ये मागणी केलेल्या सर्व मुद्यावर कोणाचाही आक्षेप आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी केलेला दावा योग्य आहे. दिलेले पुरावे योग्य आहे. या कारणांमुळे सामूहिक वनहक्काचा दावा मान्य करण्यायोग्य असल्याचा निष्कर्ष वनहक्क समितीने नोंदवून ग्रामसभेत ठेवण्यासाठी ग्रामसभा सचिव यांच्याकडे पाठविण्यात आला.२१ मे २0१४ रोजी बोलाविण्यात आलेल्या ग्रासभेत संपूर्ण दाव्याचे व पडताळणी समितीच्या अहवालाचे वाचन करून मंजुरीसाठी ग्रामसभेत ठेवण्यात आला. त्याला ग्रामसभेत सर्वसंमतीने मंजुरी देण्यात आली. यावेळी २0५ ग्रामसभा सदस्य उपस्थित होते. ग्रामसभेने मंजूर केलेला सामूहिक वनहक्क दावा योग्य असल्याची खात्री करून वनहक्क मान्य करण्यासाठी शिफारस दाव्याच्या मूळ प्रतिसह व सर्व दस्ताऐवजासह उपविभागीय स्तरीय वनहक्क समिती वरोरा यांचेकडे सादर केला. (वार्ताहर)
३७१ एकर वनभूमीवर वनहक्काचा दावा
By admin | Published: June 04, 2014 11:37 PM