सास्ती : गाव, मंदिराचे पावित्र्य जपण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपले घर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मात्र राजुरा शहरातील गडचांदूर रस्त्यावर असलेल्या नाल्यातील घाण व अस्वच्छतेमुळे भाविकांसह प्रवाशांचे आरोग्य सांभाळणे कठिण झाले आहे. नाल्याच्या काठावर असलेल्या भवानी मंदिराचे पावित्र्यही धोक्यात आले आहे. राजुरा- गडचांदूर रस्त्यावर राजुरा शहरालगतच मोठा नाला वाहतो. हा नाला राजुरा नगर परिषद व रामपूर ग्रामपंचायतीच्या सिमेवर आहे. नाल्याच्या एका बाजूने राजुरा नगर परिषद व दुसऱ्या बाजूला रामपूर ग्रामपंचायतीची हद्द आहे. याच नाल्याच्या काठावर पुरातन व जागृत भवानी मंदिर आहे. तर नाल्याच्या काठावरच राजुरा, रामपूर व परिसरातील गावांतील नागरिक अंतिमसंस्कार पार पाडतात. नाला शहराच्या अगदी जवळून वाहत असल्यामुळे शहरातील महिला गौरी विसर्जनाकरिता याच ठीकाणी मोठी गर्दी करतात. शहरातील घरगुती गणेश विसर्जनही येथे केले जाते. जंगलातून वाहत येणारा हा नाला नेहमी जिवंत राहत असून या नाल्याला मोठे महत्व आहे. परंतु या नाल्यात राजुरा शहरातील सांडपाणी सोडल्या जात असल्याने तसेच नाल्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. कचरा सडल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.भवानी मंदिरात नागरिक मनशांतीसाठी येतात परंतु दुर्गंधीमुळे मनशांती सोडाच, त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मोक्षधामात येणाऱ्या मृतकांच्या कुटुंबियांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. अंतिमसंस्काराप्रसंगी नाल्याच्या पाण्यात डुबकी मारण्याची प्रभा आहे. परंतु मोक्षधामालगत नाला असूनसुद्धा नाल्यातील अस्वच्छतेमुळे याठिकाणी ही प्रथा पाळता येत नाही. अनेकवेळा मृतकांचे कुटुंबीय दुसरीकडे जात आहे. औद्योगिकरणामुळे राजुरा शहरात मोठ्या प्रमाणात बाहेरून कामगार तसेच इतर व्यावसायिक स्थायिक झाले आहे. अनेकवेळा मोठ्या प्रमाणात कचरा नाल्यात टाकल्या जात आहे. सदर नाला राजुरा नगर परिषद व रामपूर ग्रामपंचायतीच्या सिमेवर असल्यामुळे याची स्वच्छता नेमकी कुणी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याकडे राजुरा नगर परिषद लक्ष द्यायला तयार ना नाही तर ग्रामपंचायतही दुर्लक्ष करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. त्यामुळे शासकीय, निमशासकीय संघटनांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे. परंतु पंतप्रधानाच्या या निर्देशाला मात्र याठिकाणी विसर पडला आहे. (वार्ताहर)
सीमावादात अडकली नाल्याची स्वच्छता
By admin | Published: January 05, 2015 11:01 PM