घुग्घुस : सध्या गावात सत्ताधारी सदस्याकडून ग्रामपंचायतीच्या मजुरांचा अप्रत्यक्षरित्या स्वत:च्या कंत्राटी कमासाठी उपयोग करित असल्याचा विषय गाजत असतानाच शनिवारी एका सदस्याने गावातील साफसफाईकडे दुर्लक्ष करून हनुमान जयंतीनिमित्त येथील ग्रामपंंचायतीतील २० मजुरांच्या मदतीने चक्क घुग्घुस-चंद्रपूर रस्त्याची साफसफाई करून घेण्याचा प्रताप केल्याने पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. महावीर जयंती व गुडफ्रायडेनिमित्त सतत दोन दिवस सुट्या असल्याने दररोज गावात सुरू राहणारी साफसफाई बंद होती. त्यामुळे गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. असे असताना शनिवारी गावात ठिकठिकाणी हनुमान जयंती व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. मात्र ग्रामपंचायतीचे सत्ताधारी सदस्य पुंडलिक उरकुडे यांनी गावातील स्वच्छतेपेक्षा घुग्घुस बसस्थानक परिसरातून चंद्रपूरकडे जाणाऱ्या महामार्गावरील रस्ता ग्रामपंचायतीच्या मजुरांकडून स्वच्छ करून घेतला. यासाठी २० महिला व पुरुष मजुरांना जुंपण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या मजुरांकडून गावातील साफसफाई करण्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारित येणाऱ्या रस्त्याच्या साफसफाई कामात लावल्याने गाववासियांना पुन्हा एक चर्चेचा विषय मिळाला आहे. रस्ता स्वच्छ करणे ही बाब चुकीची नाहीे; पण त्या रस्त्यावरून दिवसरात्र वेकोलि, लायड, एसीसी आदी कंपन्यांची जडवाहने धावत असतात. यामुळे रस्त्यावरून धूळ उडत असुन प्रदूषण होत आहे. धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रस्त्यावर पाण्याचे सिंचन करण्याचे काम या उद्योगांकडून करण्यात येत असताना आज अचानक पुंडलिक उरकुडे यांनी दोन दिवसांपासून गावात साफसफाई झाली नाही, हे माहित असताना व आज गावात हनुमान जयंतीचा कार्यक्रम असताना त्याकडे दुर्लक्ष केले. (वार्ताहर)
गाव सोडून महामार्गावर स्वच्छता अभियान
By admin | Published: April 05, 2015 1:31 AM