आॅनलाईन लोकमतमूल : येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन मागील ७ महिन्यांपासून कंत्राटदार संस्थेने दिले नाही, त्यामुळे कामगारांनी २७ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले असून कर्मचारी कुटुंबीयांचे हाल होत आहेत.गडचांदूर, मूल, राजुरा, कोरपना आणि गोंडपिपरी येथील रुग्णालयातील स्वच्छतेचे कंत्राट राजुरा येथील त्रिवेणी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेला देण्यात आला आहे. सदर संस्थेअंतर्गत मूल उपजिल्हा रुग्णालयात संजय रेचनकार, वामन कोडापे, सुरेखा कोडापे, विशाल सांडे, लता सांडे, महिंद्रा रामे आदी सफाई कामगार म्हणून काम करतात. सर्वांचे वेतन मागील ७ महिण्यांपासून संस्थेने दिले नाही. यामुळे कामगारांनी वैद्यकीय अधिक्षकांकडे १५ जानेवारीला निवेदन देवून समस्येकडे लक्ष वेधले. पण, दखल घेतली नाही. त्यामुळे २७ जानेवारीपासून सफाई कामगारानी कामबंद आंदोलन सुरू केले. कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन दरमहा नियमीतपणे अदा करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी जानेवारीमध्ये कंत्राटदार संस्थेला पत्र देवून तत्काळ वेतन अदा करा, असे निर्देश दिले होते. मात्र अद्याप कामगारांना वेतन मिळाले नाही. परिणामी, कंत्राटी कामगारांनी सहायक कामगार आयुक्तांकडे निवेदन देवून न्यायाची मागणी केली आहे.जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासोबत कंत्राटदार संस्थेशी करार झाला आहे. या करारातील शर्तीनुसार कामगारांना नियमित दरमहा वेतन देणे करणे बंधनकारक आहे. २७ डिसेंबरला जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कंत्राटदार संस्थेला ५ लाख २५८६ रुपये दिले. पण, या संस्थेने कामगारांचे वेतन हेतूपूर्वक अडवून ठेवल्याचा आरोप कामगार करीत आहेत.कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले. जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्रिवेणी सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थेला पत्र पाठवून कामगारांचे वेतन ५ फेब्रुवारीपर्यंत द्यावे. अन्यथा भविष्यात निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, अशी ताकीद कंत्राटदार संस्थेला देण्यात आली. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. कामगारांचे वेतन संस्थेने दिले नाही.कंत्राटी कामगारांकडून कामे करताना कामगार कायद्याचे पालन करण्याचा नियम आहे. कामाचे तास आणि सुरक्षा यासंदर्भात कंत्राटदार संस्थेने कायद्याचे उल्लंघन केले. यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक सदर संस्थेवर कोणती कारवाई करतात याकडे सर्व कंत्राटी कामगाराचे लक्ष लागले आहे.याबाबत त्रिवेणी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे राजेंद्र डोहे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आहे.उपजिल्हा रुग्णालयात घाणीचे साम्राज्यउपजिल्हा रुग्णालयातील ६ सफाई कामगारांनी १५ जानेवारीला पत्रव्यवहार करून ७ महिण्यांचे वेतन तत्काळ मिळण्याची मागणी केली होती. न्याय मिळाला नाही, तर २७ जानेवारीपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनाही निवेदनाद्वारे माहिती दिली. न्याय न मिळाल्याने १० दिवसांपासून कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले. दरम्यान, कंत्राटदार संस्थेने सफाई कामगारांचे वेतन द्यावे, अशी प्रतिक्रिया उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. अनिल गेडाम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
वेतनाअभावी सफाई कामगारांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 11:38 PM
येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन मागील ७ महिन्यांपासून कंत्राटदार संस्थेने दिले नाही, त्यामुळे कामगारांनी २७ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले असून कर्मचारी कुटुंबीयांचे हाल होत आहेत.
ठळक मुद्देसात महिन्यांपासून वेतन नाही : कामगारांमध्ये संताप