लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार वृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले असून, काही भागात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.गुरुवार संध्याकाळपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोर पकडला. ब्रह्मपुरी भागात तर पूरसदृश परिस्थिती पहावयास मिळते आहे. नद्या व नाल्यांवरचे पूल पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणची मातीची व जुनी घरे कोसळून नागरिकांची वित्त हानी झाली आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात आभाळ फाटल्यासारखी स्थिती आहे. कोरपना येथेही मध्यरात्रीपासून सलग पाऊस कोसळतो आहे. गंगालवाडी, पळसगाव येथेही पहाटेपासूनच पर्जन्यवृष्टी होते आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील काही ठिकाणची मातीची घरे कोसळली आहेत.पावसाचे पाणी शेतीत शिरून सोयाबीन नासले आहे तर कापूस पिवळा पडल्याचे वृत्त आहे. शेतकरी हवालदील असून, जनजीवन ठप्प झाले आहे.
ब्रम्हपुरी शहरात बारई तलावाच्या काठावरून पाणि वाहत गेले आहे तसेच या तलावाला भगदाड पडल्याने तलावाखालील असलेला शेषनगर या लोकवस्ती ला धोका संभवण्याची शक्यता आहे. तसेच शांतीनगर, आनंदनगर. भवानीवॉर्ड, धुम्मनखेडा वॉर्ड आदी परिसर जलमय झाला आहे. ब्रम्हपुरी च्या मुख्य ख्रिस्तानंद चोकात 2 ते 3 फूट पाणी जमा आहे. प्रशाशन बारई तलावावर नजर ठेवून आहे. तालुक्यातील ग्रामीण भाग सध्यस्थीतत बरा आहे. घरांची मात्र पडझड झाली आहे