राजेश मडावी
चंद्रपूर : उन्हाची तीव्रता घसरू लागल्याने विजेची मागणी थोडी कमी झाली आहे. त्यामुळे कोळसा टंचाईने हैराण झालेल्या महानिर्मितीवरील संकटही काही प्रमाणात टळले आहे. राज्यातील सात वीज केंद्रांना दररोज एक लाख ४० हजार मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातही सहा दिवस पुरेल इतका काेळसा शिल्लक असल्याची माहिती आहे.
महानिर्मितीचे राज्यात सात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे आहेत. या केंद्रातून दररोज सव्वा लाख ९५४० मेगावॉट वीजनिर्मिती होऊ शकते. मात्र, मार्च २०२२ पासून देशात कोळसा टंचाई सुरू झाल्याने महानिर्मितीच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला. दैनंदिन कोळशाची गरज सव्वा लाख मेट्रिक टनाची आवश्यकता असताना कोळसा कंपन्यांकडून केवळ ८०-८५ मेट्रिक टन कोळसा मिळत होता. त्यामुळे वीज केंद्रांवरील काेळशाचा साठा एक दिवस पुरेल एवढा घसरला.
वीज केंद्रनिहाय उपलब्ध कोळसा
कोराडी, नाशिक, भुसावळ, परळी, पारस, चंद्रपूर, खापरखेडा या चार वीज केंद्रांतून राज्यात वीजनिर्मिती सुरू आहे. यातील चंद्रपूर व काेराडी केंद्रात सहा दिवसांचा कोळसा उपलब्ध आहे. परळी व भुसावळ केंद्रात सर्वाधिक १० ते ११ दिवस पुरेल एवढा कोळसा आहे. नाशिक दोन दिवस, तर खापरखेडा वीज केंद्रात पाच दिवस पुरेल एवढा कोळसा असल्याने फार अडचण येणार नाही, असा अंदाज महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.