लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोळशाच्या धुळीने पांढरे सोने पूर्णत: काळवंडल्यामुळे कापूस वेचणी करायला मजूर मिळत नसल्याची सध्या स्थिती आहे. त्यातच कापसाची प्रत घसरल्यामुळे भाव सुद्धा मिळत नसल्याचे चित्र गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव परिसरात बघायला मिळत आहे. त्यामुळे कोळशाची धुळीवर नियंत्रण मिळवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे.राजुरा तालुका प्रदूषणात अग्रेसर आहे. वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव परिसरात नेहमीच कोळशाचा धुर उडतोे. या परिसरात कोळसा खाणी असल्याने कापसाचे पीक पूर्णत: काळे पडले आहे. त्यामुळे वेचणीसाठी मजुर सुद्धा येत नसून शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.प्रत खालावल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात आपला कापूस विकावा लागत असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे. एक तर भाव नाही त्यातच धुळीमुळे हातचे पीक वाया जात आहे. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न परिसरातील शेतकरी करीत आहेत.
कोळश्याच्या धुळीमुळे कापसाची प्रत घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 10:45 PM