फोटो
केपीसीएल प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर काम सुरू
भद्रावती : नुकत्याच सुरू झालेल्या कर्नाटक पाॅवर कार्पोरेशनच्या इंटिग्रेटेड बरांज ओपन कास्ट खाणीतील कामगारांनी आपल्या विविध समस्यांसाठी गुरुवारी तब्बल सहा तास कोळसा खाण बंद ठेवून आंदोलन केले. शेवटी केपीसीएल व स्थानिक प्रशासनाच्या मध्यस्थीने लेखी आश्वासन मिळाल्याने कोळसा खाण पूर्ववत सुरू करण्यात आली.
१ डिसेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने केपीसीएल इंटिग्रेटेड बरांज ओपन कास्ट माइनचे काम सुरू झाले. सहा महिने उलटूनही कामगारांच्या विविध समस्यांचे कंपनीद्वारे निवारण केले जात नाही. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या समक्ष १८ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत कंपनी व्यवस्थापन आणि प्रकल्पग्रस्त कामगारांत करार होऊन कामगार कंपनीचे काम करण्यास तयार झाले; परंतु कंपनीद्वारे अद्यापही कराराची अंमलबजावणी झालेली नाही. कामगार संघटनेची कंपनी व्यवस्थापनाकडे जाऊन चर्चा होत असून, कंपनी व्यवस्थापन कामगारांची व प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
शेवटी कंपनी व्यवस्थापन स्थानिक महसूल प्रशासन व कामगारांमध्ये चर्चा होऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. समस्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा खाण बंद करण्यात येईल, असा इशाराही कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला.
या चर्चेदरम्यान नितीन चालखुरे, धीरज पुनवटकर, प्रमोद गणवीर, प्रमोद करवडे, गौरव रणदिवे, दिलीप नागपुरे, श्याम डोंगे यासह कामगार उपस्थित होते.
बॉक्स
अशा आहेत मागण्या
कंपनीद्वारे कामगारांशी दूरव्यवहार सुरू असून, कामगारांना नियुक्तीपत्र देण्यात यावे, नवीन वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, नवीन वेतन तत्काळ देण्यात यावे, भविष्य निर्वाह निधीचा एप्रिल २०१५ ते २०१९ पर्यंतचा भरणा करण्यात यावा, वैद्यकीय सुरक्षा द्यावी आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोळसा खाण बंद पाडण्यात आली.