प्रकल्पग्रस्त भूमिकेवर ठाम : पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूचमाजरी : भूमी अधिग्रहित केल्यानंतर नोकरीवर रुजू करण्याच्या मागणीसाठी वेकोलिच्या प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेले खदान बंद आंदोलन आज रविवारी पाचव्या दिवशीही सुरू होते. यात सुमारे ९० हजार टन कोळशाचे उत्पादन होऊ शकले नाही. त्यामुळे वेकोलिला सुमारे २५ कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे.दरम्यान, आज रविवारी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी या आंदोलनाची दखल घेतली व प्रकल्पग्रस्तांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. वेकोलि माजरी प्रशासनाने शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करुन गेल्या दोन वर्षापासून उत्पादन घेणे सुरू केले आहे. यात जवळजवळ १२० प्रकल्पग्रस्तांना अजूनपर्यंत नोकरी न दिल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी खदाण बंद करीत आंदोलन पुकारले. आज शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. लागोपाठ पाच दिवस उत्पादन ठप्प असल्याने वेकोलिला २५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.शुक्रवारी सकाळी वेकोलिचे महाप्रबंधक सत्येंद्र पाण्डेय यांनी आंदोलनस्थळी बैठक घेतली. यावेळी नियोजन अधिकारी मुजाहीदीन, शर्मा कार्मिक प्रबंधक त्रिपाटी, प्रहारचे नेता अमोल डूकरे, प्रकल्पग्रस्त निलेश ढवस, संदीप झाडे, गोकुल डोंगे, रामू डांगे, वेकोलि कामगार संघटनेचे एम. एम. माकोडे, सी.एच. राहागंडाले, दीपक डोंगरवार, आर.के. राय, धरमपाल, संजय दुबे व सर्वच प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. यावेळी महाप्रबंधक सत्येंद्र पांण्डेय यांनी १४ मार्च २०१७ पर्यंत दहा जणांना नोकरीचे आदेश देतो व उर्वरित प्रकल्पग्रस्तांना तीन महिन्यात नोकरीचे आदेश देवू असा प्रस्ताव ठेवला होता. यावर प्रकल्पग्रस्तांनी या आंदोलनस्थळावर सर्वच प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेश दिल्याशिवाय ही नागलोन ओपनकास्ट खदान २ सुरु होवू देणार नाही, अशी भूमिका मांडली होती. आंदोलनकर्ते अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असून कुटुंबियांसोबत खदानीत ठिय्या देऊन आहेत. दरम्यान, आंदोलनस्थळी ८५ वर्षांच्या दोन वयोवृद्ध महिला आपल्या नातवाला नोकरी मिळावी, यासाठी रात्रंदिवस खदानीत राहत आहेत.रविवारी किशन वर्मा, अरुण सिंह, राजेश मौर्य, तपस्वी कुलसंगे यांच्याकडून आंदोलनकर्त्यांना सरबत वाटप करण्यात आले तर नवनिर्वाचित जि.प. सदस्य प्रविण सूर यांच्याकडून प्रकल्पग्रस्तांना भोजन वाटप करण्यात आले.(वार्ताहर)
कोळसा खाणीतील ९० हजार टन कोळशाचे उत्पादन ठप्प
By admin | Published: March 06, 2017 12:26 AM