वेकोलीच्या मुंगोली, पैनगंगा, कोलगाव कोळसा खाणीतून कोळसा वाहतुकीसाठी मुंगोली वर्धा नदी पुलावरून नकोडा गावाच्या पूर्व दिशेकडून घुग्घुस, चंद्रपूर, वणीकडे जाण्याचा मार्ग आहे, तर दुसरा मार्ग उसगाव, शेणगाव मार्ग चंद्रपूर महामार्गाला जोडला गेला. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्या रस्त्याचा उपयोग न करता माउंट कारमेल व नकोडा गावाला एसीसी सुरक्षा भिंतीच्या बाजूने असलेल्या रस्त्याचा उपयोग करीत असल्याने माउंट कारमेल शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रदूषणाचा फटका बसतो. नकोडा गावातील लोकवसाहतीलाही प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.
एसीसीने माउंट कारमेल व कारखान्याच्या सुरक्षा भिंतीच्या लागून असलेल्या रस्त्यावर बॅरिकेट लावले तर दुसरीकडून नकोडा ग्रामपंचायतीने ट्रक वाहतूक होऊ नये म्हणून गावाजवळून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. नंतर हे दोन्ही मार्ग सोडून माउंट कारमेलच्या मागच्या बाजूने वळण घेत परत सिमेंट रस्त्यावरून पोलीस ठाण्याच्या समोरून कोळसा वाहतूक होत आहे. मात्र, वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांकडून कारवाई का होत नाही, हा चर्चेचा विषय बनला आहे.