लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : पैनगंगा ते घुग्घूस दरम्यान बैरमबाबा मंदिर परिसरात नव्या तयार करण्यात आलेल्या वळण मार्गावर कोळसा भरण्यासाठी वेकोलिकडे भरधाव जाणाऱ्या हायवा ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या व रेतीसाठी जाणाऱ्या ट्रॅक्टरला जबर धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅक्ट्ररवरील दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रॅक्टर चालक मनोज शंकर राॅय व मजूर रुपेश बारसागडे यांचा जागीच मृत्यू झाला तर सुनील हा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर घुग्घुस येथील संतप्त नागरिकांनी घटनास्थळ गाठल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. मृतकाला ५० लाखांची आर्थिक मदत मिळावी, यासाठी जमावाने दोन्ही बाजूच्या मार्गांवरील वाहतुक रोखून धरली. रात्री उशिरापर्यंत तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते. मृतदेहही घटनास्थळीच होेते. यातील जखमीला तातडीने चंद्रपूरला हलविण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, पैनगंगा कोळसा खाणीतील वाहतुकीसाठी येथील बहिरम बाबा मंदिराच्या मागून काही दिवसांपूर्वी नवीन वळण रस्ता तयार करण्यात आला. या मार्गाने कोळशाची वाहतूक करण्यासाठी पैनगंगा कोळसा खाणीकडे भरधाव जाणाऱ्या हायवा ट्रक क्रमांक (एमएच ३४, एबी ९३६२)ने (एमएच ३४, एपी ०५०८) क्रमांकाच्या ट्रॅक्टरला जबर धडक दिली. यामध्ये ट्रॅक्टर चालक मनोज शंकर राॅय व ट्रॅक्टरवर असलेला मजूर रुपेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनाल हा गंभीर जखमी झाला. (संबंधित वृत्त/५)