लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात २०१४ मध्ये १११ वाघ होते. २०२१ अखेरपर्यंत वाघांची संख्या ३०० पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. चिंतेची बाब म्हणजे वाघ-मानव संघर्षही वाढत आहे. या संघर्षात आतापर्यंत २६ वाघ आणि १२२ व्यक्तींचा मृत्यू झाला. अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात. त्यासाठी वाघ, वन्यजीव व मानवातील सहअस्तित्वावर आधारित दीर्घकालीन उपायांची गरज आहे. तरच वाघांची संख्या वाढेल आणि संघर्षही संपेल, असा आशावाद वन्यजीव अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे.
हमखास व्याघ्र दर्शन घडविणारा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध आहे. उत्तम अधिवास, वन्यजीव क्षेत्रातील संरक्षणामुळे वाघ व वन्यजीवांची संख्या वाढू लागली. चंद्रपूर शहराजवळच तब्बल २१ वाघ आहेत. चंद्रपूर प्रादेशिक जंगलात ३० पिलांच्या वाघिणी, ३७ बछडे आणि ४१ लहान व वयस्क वाघ आहेत, तर दुसरीकडे वाढती लोकसंख्या, चुकीच्या विकास संकल्पना व रोजगाराच्या अभावामुळे नागरिकांची जंगलावरील अवलंबिता वाढली. सुमारे ८०० गावे जंगलात किंवा जंगलालगत आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला. २०१४ ते २०२१ या वर्षांत नैसर्गिक, अपघात व शिकार अशा घटनांत ६४ वाघांचा मृत्यू झाला. हा संघर्ष कमी करण्यासाठी २६ जुलै २०२१ रोजी नागपूर येथील अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वनाधिकारी आणि तज्ज्ञांची वेबिनार बैठक घेऊन सूचना व उपाययोजना मागविल्या आहेत.
अशा आहेत उपाययोजना...
वन जमीन व वाघांच्या भ्रमणमार्गात वनीकरण, गवताळ प्रदेश वाढवावा, जलसाठे तयार करावेत, गावाजवळ मोह, फळझाडे, तेंदू झाडांची लागवड करावी, शेतीसाठी सोलर कुंपण, गावांची जंगलावरील अवलंबिता कमी करावी, जंगलातील रस्त्यांना वन्यजीवांना आतून मार्ग द्यावा, वनशेतीला चालना, वाघ-मानव संघर्षासाठी स्वतंत्र सेल स्थापन करावा, जंगलात चराईवर नियंत्रण आणावे, वन विभागाने नियमित निरीक्षण करावे, शासनाने लोकांच्या आत्मनिर्भरतेसाठी विविध विकास योजना राबवाव्या, आदी उपाययोजना चंद्रपुरातील तज्ज्ञांनी सुचविल्या आहेत.
वाघ, वन्यजीव व मानवाच्या सहअस्तित्वाची गरज आहे. मात्र, वाघ, वन्यजीव-मानव संघर्ष वाढला. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ५५ टक्के घटना ब्रम्हपुरी, २५ टक्के चंद्रपूर व २० टक्के घटना मध्य चांदा विभागात घडल्या आहेत. दोघांचेही प्राण वाचवायचे असतील, तर वन विभाग, नागरिक, स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन दीर्घकालीन उपायांवर भर द्यावा, याकडे नागपुरातील बैठकीत लक्ष वेधले.
- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर