तोहोगाव : मध्य चांदा वनविभागात वने व वन्यजीव संरक्षण होण्याचे दृष्टीने सामूहिक वन गस्त हा अभिनव उपक्रम उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक वनपरिक्षेत्रात आठवळ्यात दोन दिवस सुरू केला आहे. यामुळे वने व वन्यजीव संरक्षण आणि जंगलालगत असणाऱ्या ग्रामस्थांच्या समस्यांची माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करण्यास सोयीचे होत असल्याचे मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी सांगितले.
नुकतेच कोठारी वन परिक्षेत्रातील परसोडी नियत वनक्षेत्र येथे वन परिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी जिवती वन परिक्षेत्राचे शेणगाव उपक्षेत्रातील शेणगाव, राहापली, मराई पाटण या नियतवन क्षेत्रात वन परिक्षेत्र अधिकारी योगिता मडावी यांच्या नेतृत्वात सामूहिक वन गस्त करण्यात आली. यावेळी क्षेत्रीय वन कर्मचारी यांना क्षेत्र सीमा, अडचणी व उपाययोजनाबाबत माहिती देण्यात आली. यात सर्व क्षेत्र सहायक, वनरक्षक, वन मजूर सहभागी झाले होते. या सामूहिक वन गस्तीमुळे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत असल्याची प्रतिक्रिया वन कर्मचाऱ्यांनी दिली.