चंद्रपूर : राज्यात ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांच्या नोंदी घेण्यास सुरुवात झाली आहे. शेतातील शेतमालाच्या नोंदी स्वत: शेतकऱ्यांनी घेऊन या ॲपवर अपलोड करावयाच्या आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या शंकांचे निराकरण करणे, त्यांना ॲपद्वारे नोंदी घेण्यासाठी प्रवृत्त करणे, तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सुटीच्या दिवशीही पाच तालुक्यांचा दौरा केला.
भद्रावती, वरोरा, नागभीड, सिंदेवाही आणि मूल या तालुक्यांत ई-पीक पाहणीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ऑनफिल्ड’ आढावा घेतला.
वरोरा तालुक्यात सालोरी, पिंपळगाव आणि खांबाडा गावांना भेटी देऊन ई पीक पाहणीचे प्रात्यक्षिक बघितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार रोशन मकवाने-सोळंके, नायब तहसीलदार मधुकर काळे, मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच सालोरी येथील सहदेव रामन्ना, पिंपळगाव येथील गणेश ठाकरे आणि खांबाडा येथील शेतकरी रमेश मेश्राम उपस्थित होते.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, शासनाने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सर्व शेतकरी बांधवांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा. तसेच युद्धपातळीवर हे काम पूर्ण करण्यास शासकीय यंत्रणेस सहकार्य करावे. आपल्या गावाची १०० टक्के पीक पाहणी ही ई-पीक पाहणी ॲपवर ३० सप्टेंबरपर्यंत नोंदवून घ्यावी. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद स्वत: घेऊन ॲपवर अपलोड करणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कचा प्रश्न असल्यामुळे ज्या मोबाईलचे नेटवर्क आहे, त्याचा उपयोग करावा. एका अँड्राईड मोबाईलवरून २० शेतकऱ्यांच्या नोंदी घेता येते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी भद्रावती तालुक्यातील मौजा कोंढा, टाकळी व नंदोरी या गावांमध्ये, मूल तालुक्यात राजोली, डोंगरगाव आणि चिखली येथे, तर सिंदेवाही तालुक्यात पळसगाव जाट, मेंढामाल, लोणवाही व किन्ही या गावांत ई-पीक पाहणी संदर्भात भेट दिली.