अनवर खानलोकमत न्यूज नेटवर्कपाटण : जिल्ह्यातील आदिम कोलाम समुदायांना भेडसावणारे प्रश्न हे मूलभूत स्वरूपाचे व त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जुळलेले असून ते कोलामांच्या जीवनमानावर परिणाम करणारे आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करून कोलामांच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले.कोलाम विकास फाऊंडेशनने आयोजित केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचा कोलामांशी थेट संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, राजुराचे उपविभागीय अधिकारी खलाटे, तहसीलदार गोगुर्ले, कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, पंचायत समिती सभापती अंजली पवार, सरपंच सुषमा मडावी, संस्थेचे सचिव मारोती सिडाम, गाव पाटील भीमराव आत्राम, भीमराव मडावी भीमराव पवार उपस्थित होते. कोलामांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेऊन कोलाम गुड्यांवरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोलाम विकास फाऊंडेशनने व्यापक जनआंदोलन उभारले. स्वातंत्र्यदिनी घोडणकप्पी या आदिम वस्तीवर आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याआधी ढोल सत्याग्रह आयोजित केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कोलामांच्या प्रश्नांवर बैठक बोलावून चर्चा केली. त्याच वेळी कोलामांशी हितगुज करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार शुक्रवारी जिवती तालुक्यातील सीतागुडा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात जवळपास २५ कोलाम गुड्यांवरील कोलाम बांधव सहभागी झाले. प्रत्येक कोलाम गुड्यांवरील रस्ता, पाणी, घरकुल, जात प्रमाणपत्र, शेती पट्टे अशा अनेक विषयांवर कोलामांनी आपली व्यथा मांडली. कोलामांचे मूलभूत व दैनंदिन जीवन प्रभावित करणारे प्रश्न ऐकून जिल्हाधिकारी व्यथित झाले. यानंतर कोलामांना आपले प्रश्न घेऊन कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज पडू नये व त्यांची आवश्यक कागदपत्रे मिळावी यासाठी तातडीने प्रत्येक कोलामगुड्यावर शिबिरे भरविण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. सर्व समस्या सुटतील, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी धरला फेरकोलामांनी भूपाळी, दंडार व पारंपरिक वाद्यांच्या गजरात जिल्हाधिकारी व अन्य पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमस्थळी सादर झालेल्या कोलामांच्या पारंपरिक नृत्यात जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी रमले व त्यांनीही कोलामांसोबत फेर धरला.