चंद्रपूर : जिल्ह्यातील कापूस पिकावर झालेल्या मर रोगामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण शेतातील पिके करपत आहेत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून संभाजी ब्रिगेडनेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन प्रशासनाला मदतीसाठी साकडे घातले आहे. शेतातील करपलेली झाडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी धडक दिली. चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान होत असताना त्यात कोरडा दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यासाठी वारंवार संभाजी ब्रिगेडने निवेदन देत असताना त्यावर दुर्लक्ष होत आहे. अवकाळी पावसामुळे कपाशी पिकावर मर रोग आल्याने संपूर्ण शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असून शासनाने यावर त्वरीत उपाय करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरुण आंदोलन करेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विनोद थेरे, तालुकाध्यक्ष दीपक खारकर, महानगर कार्याध्यक्ष विवेक बोरीकर यांनी दिला. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हा कृषी अधीक्षक निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे चंद्रकांत वैद्य, मंगेश चटकी, चंद्रशेखर झाडे, रुपेश सोनेकर, निमकर, महेश जेनेकर, शंकर भोगेकर, मारोती बरडे, दशरथ आत्राम, राहुल जेनेकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी कार्यालयावर संभाजी ब्रिगेडची धडक
By admin | Published: October 03, 2015 12:54 AM