पोलिसांच्या सायकली धूळखात
चंद्रपूर : तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सायकली वितरित केल्या होत्या. मात्र सद्य:स्थितीत या सायकली धूळखात पडल्या आहेत. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुलावरील गर्दीवर नियंत्रण आणावे
चंद्रपूर : येथील इरई नदीच्या दाताळा पुलावर सायंकाळच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी जातात. तसेच काही हौशी तरुण पुलाच्या मधोमध सेल्फी काढतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलावर जाणाऱ्यांना निर्बंध घालावा, नाहीतर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी केली जात आहे.
एटीएमची सुरक्षा रामभरोसे
चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात एटीएम आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी सुरक्षारक्षकच नसतो. त्यामुळे प्रत्येक एटीएम केंद्रामध्ये सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामीण भागास एसटी सोडाव्यात
चंद्रपूर : कोरोना संकटापासून एसटी सेवा विस्कळीत झाली आहे. सध्या एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र ग्रामीण भागात अजूनही एसटी पोहोचली नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामंडळाने ग्रामीण फेऱ्या सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
फुलझाडे विक्रीमध्ये आली तेजी
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी फुलझाडे विक्रीसाठी आली आहेत. नागपूर रोड तसेच मूल रोडवर नर्सरीसुद्धा आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने येथून फुलझाडे विकत घेत आहेत. सध्या या व्यवसायात तेजी आली आहे.
शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा
चंद्रपूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस कोसळणार होता. मात्र त्यांचा अंदाज खोटा ठरत आहे. पाऊस योग्य प्रमाणात येत नसल्याने अनेक ठिकाणची रोवणी खोळंबली असून, शेतकरी सध्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
मोकाट गुरांचा प्रश्न कायम
चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर रोडवर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत असून यामुळे अपघाताची शक्यता आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच एका म्हशीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये ती ठार झाली. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्कूलबस चालक, मालक अडचणीत
चंद्रपूर : जिल्ह्यात शेकडोंच्या संख्येने स्कूलबस आहेत. मात्र कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून त्या एकाच जागेवर उभ्या आहेत. परिणामी, बँक हप्ते भरणे बसमालकांना कठीण होत आहे. त्यामुळे स्कूलबसवरील व्याज माफ करण्याची मागणी केली जात आहे.
जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल तसेच जंगली प्राणी आहेत. मात्र या प्राण्यांमुळे जंगल परिसरातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांनी विविध योजनांद्वारे शेतकुंपण तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
खासगी शाळांतील शिक्षक अडचणीत
चंद्रपूर : कोरोनामुळे अद्यापही प्राथमिकच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यातच खासगी शाळांद्वारे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असला तरी शिक्षकांना पूर्ण वेतन दिले जात नसल्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. या शिक्षकांकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित
चंद्रपूर : सर्वशिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. मात्र या वर्षी अद्यापही पुस्तके वितरित केली नसल्यामुळे अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
अडगळीतील वाहनांचा लिलाव करावा
चंद्रपूर : जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या जुन्या तसेच नादुरुस्त वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बांधकाम मजुरांना किट पुरवावेत
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या संख्येने बांधकाम मजूर आहेत. मात्र अनेकांना शासकीय योजनेद्वारे देण्यात येणारे किट पुरविण्यातच आलेले नाहीत. परिणामी ते यापासून वंचित आहेत. त्यामुळे प्रत्येक बांधकाम मजुराला किट पुरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुकानांची वेळ वाढविण्याची मागणी
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे बाजारपेठ दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येत आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असून ग्राहकांनाही अडचणीचे होत आहे. कोरोना रुग्ण संख्या घटल्यामुळे बाजारपेठेच्या वेळेत वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.