कामासाठी यंत्रणाच नाही : पावसाळ्यापूर्वी शेततळे पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची धावपळमूल : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी पर्जन्यावर आधारीत कोरडवाहू शेतीत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अंमलात आणली. मूल तालुक्यातील १११ गावातील शेतकऱ्यांना १४० शेततळे मंजुर करण्यात आले. मंजुर शेततळे तयार करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आदेश सुद्धा दिले आहे. मात्र शेततळ्याचे काम शेतकऱ्यांनाच करायचे असल्याने खाजगी कंत्राटदाराची यंत्रणा मिळत नसल्याने काम थंडबस्त्यात दिसत आहे. पावसाळ्यापुर्वी शेततळ्याचे काम व्हावे, यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असली तरी यंत्रणेअभावी शेतकरी हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस पावसाचा सुरू असलेला लपंडाव व त्यामुळे पावसाची निर्माण होणारी टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांना स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कृषी विभागाने कार्यान्वित केली. त्याला कृषी विभागाचे मूल येथील तालुका कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन दिलेले १४० शेतकऱ्यांचे उद्दीष्ट पूर्ण केले. सदर शेततळे मंजुर झाल्यानंतर शेतकऱ्यांचा रितसर काम करण्यासाठी अटी व शर्ती टाकुन ४ मे २०१६ ला आदेश देण्यात आले व सदर काम १५ दिवसाच्या आत पूर्ण करावे अन्यथा सदर आदेश रद्द केला, जाईल असे सुचविण्यात आले. मात्र १५ दिवसाचा कालावधी लोटूनही काम करण्याची यंत्रणा मिळणे शेतकऱ्यांना कठीण झाल्याचे दिसून येत आहे.मूल तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती असून शेतकरी हतबल झाला आहे. सतत नापिकीमुळे तो निराशेच्या खाईत लोटल्या जात आहे. आर्थिक स्थिती सुद्धा बिकट स्वरूपाची असल्याने सिंचनाची सोय उपलब्ध होईल, या उद्देशाने शेततळ्यासाठी अर्ज केला. मात्र शेततळे शेतकऱ्यांनाच करायचे असल्याने आर्थिक विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. शेततळे कसे तयार करावे या विवंचनेत असताना दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. मात्र काम करणाऱ्या यंत्रणा मिळत नसल्याने तो चिंतेत पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)मूल तालुक्यात १४० शेततळे मंजुर झाले आहेत. सदर शेततळे शेतकऱ्यांनीच पूर्ण करायचे असल्याने शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन पूर्ण करणे गरजेचे आहे. खाजगी यंत्रणांनी कृषी विभागाशी संपर्क करून आम्ही शेतकऱ्यांचे शेततळे तयार करून देतो. मात्र धनादेश आपल्या नावाने द्यावा असे सुचविले. शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्याचे बिल त्यांच्याच नावाने निघेल. यात कुठलाही फेरबदल करता येणार नाही, असे खाजगी यंत्रणेला सांगण्यात आले. शेतकऱ्यांनीच याबाबत पुढाकार घेऊन काम पूर्ण करावे.- प्रशांत राहाणे, तालुका कृषी अधिकारी, मूलशेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी शेततळ्याची योजना चांगली आहे. मात्र काम करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने काम थंडबस्त्यात आहे. यासाठी कृषी विभागानेच पुढाकार घेऊन शेततळे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा.- प्रशांत मेश्राम, युवा शेतकरी, मारोडा (सोमनाथ)
‘मागेल त्याला शेततळे’ योजना थंडबस्त्यात
By admin | Published: June 03, 2016 12:57 AM