सिंदेवाही : स्थानिक कल्पतरू विद्या मंदिरातील यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विद्यामंदिराचे संचालक धनंजय बन्सोड यांच्या प्रमूख उपस्थितीत नुकताच पार पडला.
अध्यक्षस्थानी पं.स. सिंदेवाही येथील गटशिक्षणाधिकारी पालवे होते. चिकाटीपूर्ण परिश्रमाला आत्मविश्वासाची जोड असेल, तर विपरीत परिस्थितीतही यश खेचून आणता येते, असे प्रतिपादन यावेळी पालवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यामंदिरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत मानसी लोखंडे, वैभव धारणे, शिवम सहारकर, परी सदन, नवोदय विद्यालयात प्रवेशपात्र अंशुल टेंभूर्णे, अपूर्वा नेवारे यांच्यासह दहावीच्या परीक्षेत विनाशिकवणी तालुक्यात प्रथम आलेली मैथिली चंदू लोधे आदींचा सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. नीट परीक्षेत यश संपादन करून वैद्यकीय शिक्षणास पात्र ठरलेल्या ऋतुजा नीळकंठ बोरकर हिचा कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.
कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करून मर्यादित संख्येत हा सोहळा आनंदमय वातावरणात झाला. प्रास्ताविक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका शेख यांनी, आभार प्रदर्शन कामडी यांनी, तर संचालन बंसी कोठेवार यांनी केले.