घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समिती : जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले पत्रघुग्घुस : स्थानिक ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा, अशी वारंवार मागणी होत असून अनेकदा आंदोलने झाली. मात्र अजूनही ४५ हजार लोकसंख्या असलेल्या घुग्घुसला नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त झाला नाही. याबाबत घुग्घुस नगरपरिषद स्थापना संघर्ष समितीने मुख्यमंत्री यांच्याकडे पत्र पाठवून आता आमच्या संयमाचा अंत पाहू नका, अशी आर्त हाक निवेदनातून केली होती. त्याची दखल घेत विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी यांना चौकशी व नियमानुसार कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. १५ हजार लोकसंख्या असलेल्या गावाला नगर परिषद देण्याचे निकष आहे. घुग्घुस गावाची लोकसंख्या ४० हजारपेक्षा अधिक आहे. नगर परिषदेची मागणी २७ वर्षापुर्वीची आहे. १९९९ ला युती शासनाच्या काळात वर्तमान वितमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात तत्कालीन मंत्री व वर्तमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नगर परिषदेची घोषणा करून टाकली होती. मात्र घोषणा घोषणाच राहिली. नगर परिषद निर्मीतीकरिता रस्ता रोको, घुग्घुस बंद, आमरण उपोषण , विरूगिरी अशी अनेक आंदोलने झाली. लोकप्रतिनिधीने आंदोलनाची दखल घेतली नाही. मात्र प्रशासनाने आश्वासन देऊन वेळकाढू घोरण स्वीकारल्याने आजतागायत नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झालेला नाही. घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीच्या वतीने १ जुनला मुख्यमंत्री यांच्याकडे पत्र पाठवून नगर परिषद निर्मीतीबाबत झालेल्या घडामोडीकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री यांनी दखल घेऊन विभागीय आयुक्ताकडे पत्र पाठवून चौकशी व नियमानुसार कारवाईचे निर्देश दिले आहे. आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. (वार्ताहर)
घुग्घुस नगरपरिषद निर्मितीची आयुक्तांकडून दखल
By admin | Published: June 30, 2016 1:15 AM