बल्लारपूर : ४ फेब्रुवारीला मानोरा येथील कक्ष क्र. ४४७ मध्ये जळाऊ लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या दत्तू रामचंद्र मडावी (५२) यांच्यावर वाघाने हल्ला केला व त्यात दत्तू मडावी यांचा जागीच मृत्यू झाला.
वन विभागातर्फे मृतकाच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजारांची मदत करण्यात आली. मध्य चांदा विभागाच्या तत्परतेने उर्वरित रक्कमही अवघ्या सहा दिवसात देऊन मृतकाच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक आधार दिला आहे.
सदर घटनेची तत्काळ दखल घेत उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, साहाय्यक वनरक्षक प्रितमसिंह कोडापे, तहसीलदार संजय राईनचवार, वैद्यकीय अधिकारी गजानन मेश्राम, कोठारीचे ठाणेदार तुषार चव्हाण, बल्लारपूर वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, क्षेत्र सहाय्यक मानोरा प्रवीण विरूटकर व वनरक्षक कमलेश मोडचेलवार यांनी आवश्यक कागदपत्रांची तत्काळ पूर्तता करून मृतकाच्या कुटुंबियांना अवघ्या सहा दिवसात नुकसान भरपाई देण्यात मदत केली.
सदर घटनेतील धनादेशामधील पाच लाख मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूरचे अरविंद मुंढे यांच्या हस्ते मृतकाची पत्नी चंद्रकला मडावी यांना मानोरा ग्रामपंचायत कार्यालयात देण्यात आले. उर्वरित १० लाखांची मृतकाच्या वारसाच्या नावाने मुदत ठेव करण्यात आली असल्याची माहिती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिली.