चंद्रपूर: जिल्ह्याच्या वरोरा, भद्रावती तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे गहू व चना पिकाचे मोठे नुकसान झाले असून, अक्षरशः काही शेतात चना व गहू पिके जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे हाती आलेले पीक आता पूर्णतः अस्मानी सुलतानी संकटात भुईसपाट झाले आहे. त्यामुळे शेतपिकांचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
पीक विम्याचे पैसे त्वरित देण्यात यावे, खरीप हंगामातील नुकसानीची मदतसुद्धा त्वरित देण्यात यावी, अशी मागण्यांचे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमावार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी, महेश वासलावार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, रमेश काळबांधे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, करण नायर, मयूर मदनकर आदी उपस्थित होते.