आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सध्या देशात सर्वात मोठी स्पर्धा स्वच्छतेबाबत सुरू आहे. त्यामुळे स्वच्छता अभियानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील वर्षी महाराष्टÑ या अभियानात विशेष काही करू शकला नाही. मात्र यावर्षी राज्याने चांगली तयारी केली आहे. चंद्रपूरने या अभियानात आघाडी घेतली असून चंद्रपूरची स्पर्धा आता नवी मुंबई, अहमदाबाद, सुरत, बेंगलूर यासारख्या सर्वोत्तम शहराशी असल्याचे मत नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांनी व्यक्त केले.स्वच्छता अभियानात चंद्रपुरात काय उपक्रम राबविले जात आहे, याबाबतचा आढावा घेण्यासाठी प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर चंद्रपुरात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या सभागृहात सोमवारी त्यांनी सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांची तातडीची आढावा सभा घेतली. यात त्यांनी मनपाची सर्व तयारी, स्वच्छता अभियानातील कागदपत्र, मनपाचे भावी नियोजन याचा गोषवारा घेतला. सभेला मनपा आयुक्त संजय काकडे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे आदी उपस्थित होते.यावेळी मनीषा म्हैसेकर म्हणाल्या, सन २०१४-१५ मध्ये लोकांच्या गरजांविषयी कौल जाणून घेतला होता. तेव्हा बहुतांश लोकांनी पाण्याला प्राथमिकता दिली होती. त्यानंतर स्वच्छता आणि सुरक्षा प्रदान करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून स्वच्छतेवर विशेष जोर दिला जात आहे. चंद्रपुरात स्वच्छतेबाबत चांगले काम होताना दिसत आहे.चंद्रपूरने देशात ७६ वा, महाराष्टÑात सहावा तर विदर्भात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. आता चंद्रपूरच्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे सर्वांनी आपसी मतभेद बाजुला सारून या विषयावर एकत्र येऊन काम करावे व मागील वर्षी ज्या त्रुटी राहिल्या त्या दूर कराव्या. स्वच्छता अभियानात चंद्रपूर देशात अव्वल कसा येईल, या दृष्टीने प्रयत्न करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांची चंद्रपूरवर बारीक नजरचंद्रपूर मनपाचे स्वच्छतेबाबतचे काम चांगले आहे. यासोबतच या शहराचे भाग्यही चांगले आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बारीक नजर या शहरावर आहे, असेही यावेळी मनीषा म्हैसेकर यांनी सांगितले. राज्यातील ३५० शहरांपैकी ३५ शहरांवर लक्ष ठेवण्याचे काम माझ्याकडे आहे. यात चंद्रपूरला मी प्राथमिकता दिली आहे. अधिकाऱ्यांनी गंभीरतेने काम करावे व जनतेकडून वारंवार फिडबॅक घेत रहावा, असेही त्यांनी सांगितले.कम्पोस्ट डेपोची केली पाहणीमनीषा म्हैसेकर यांनी चंद्रपुरात आल्यानंतर प्रथम बाबुपेठ मार्गावरील कम्पोस्ट डेपोची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर म्हैसेकर यांनी शहरात फेरफटका मारून शहरस्वच्छतेचा आढावाही घेतला. त्यानंतर मनपा अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या सभेला त्या उपस्थित झाल्या.
चंद्रपूरची सर्वोत्तम शहरांशी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:28 PM
सध्या देशात सर्वात मोठी स्पर्धा स्वच्छतेबाबत सुरू आहे. त्यामुळे स्वच्छता अभियानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
ठळक मुद्देमनीषा म्हैसेकर : स्वच्छतेत देशात अव्वल येण्यासाठी दिल्या टिप्स