चंद्रपूर : वरोरा येथे मागील काही शैक्षणिक सत्रांपासून लिटिल एन्जेल हायस्कूल हे प्रायव्हेट कान्व्हेंट सुरू असून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी तथा पालकांना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमाचे उल्लघन केले जात आहे. याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना पालकांनी निवेदन सादर केले. शाळेचा प्राचार्यांना निवेदन दिले असता ते निवेदनदेखील स्वीकारत नाहीत. त्यामुळे शेकडो पालकांनी एकत्र येऊन सर्व समस्यांवर सहविचार सभेचे आयोजन केले. त्यानंतर पालकांनी शाळेतील समस्यांचा पाढाच ना. हंसराज अहीर यांच्यापुढे वाचला. त्यावर ताबडतोब शिक्षण विभागाने चौकशी करून योग्य ती उपाययोजना व त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी जि.प. शिक्षण विभागाला दिल्या. निवेदनात पीटीडब्ल्यूए स्थापण न करणे, अवाजवी डोनेशन व डेव्हलपमेंट फी घेऊन रितसर पावती न देणे, दरवर्षी अवाजवी शुल्क वाढ करणे, ई-लर्निंगची योग्य सुविधा नसणे, सीबीएसई पॅटर्न इयत्ता दहावीपर्यंत नसणे, प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक न करणे आदी विविध मागण्याचा समावेश आहे. शिष्टमंडळात जहूर शेख, दादा मेश्राम, चिकाटे यांचा समावेश होता. त्यांना मनिषा फलोदिया यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
लिटिल एन्जेल हायस्कूलविरोधात तक्रार
By admin | Published: September 23, 2016 1:08 AM