कालबद्ध कार्यक्रम तयार करा : सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश चंद्रपूर : जिल्ह्यातील जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांची कामे वेगाने पूर्ण करावीत, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात यावा, असे आदेश वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्यासह क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी २६.७४ कोटी तर बल्लारपूर क्रीडा संकुलासाठी २६.६० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी ६ कोटी रुपयांची तर बल्लारपूर क्रीडा संकुलासाठी ६.०४ कोटी रुपयांची तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता आहे. उर्वरित वाढीव अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी तत्काळ प्रस्ताव तयार करून तो राज्य क्रीडा विकास समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात यावा असे वित्तमंत्री मुनगंटीवार म्हणाले. बल्लारपूर क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी २.०० हेक्टर आर जागा वन विभागाकडून प्राप्त करून घ्यावी, त्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा व त्यास लवकरात लवकर विहित मार्गाने मान्यता घ्यावी, असेही सांगितले. तसेच यावेळी जिल्ह्यातील विविध समस्या व नागरिकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)
क्रीडा संकुलांची कामे वेगाने पूर्ण करा
By admin | Published: July 22, 2016 1:05 AM