नागरिकांची मागणी: निवडणुकीत दिली होती विविध आश्वासने सिंदेवाही: सिंदेवाही नगर पंचायत निवडणुकीदरम्यान कोणी कोणत्या प्रश्नावर तर कोणी विविध समस्यांवर आवाज बुलंद करताना पाहावयास मिळत होते. विविध पक्षातर्फे नगर विकासाबाबत जाहीरनामा व वचननामा घेऊन उमेदवार प्रचार करीत होते. २७ नोव्हेंबर २०१६ ला सिंदेवाही नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपाची सत्ता आली, परंतु नगरात अजूनपर्यंत विकासाची कामे सुरु झालेली दिसत नाहीत. फक्त वृत्तपत्रात टेंडर प्रकाशित होत आहेत. ४० वर्षापासून सिंदेवाही येथील नागरिक विविध समस्यांच्या विळख्यात जीवन जगत आहेत. नगर पंचायत निवडणूकदरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वचननाम्यात सिंदेवाही नगराला नियमित पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने कालबाह्य झालेली पाईप लाईन बदलवून नगरात शुद्ध पाणी पुरवठा करणे, सिंदेवाही नगरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था संपूवन सर्व रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे, सिंदेवाही येथील स्मशानभूमीची जागा उपलब्ध करुन सौंदर्यीकरण व आवश्यक सुविधा उपलब्ध करणे, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन गटार निर्मिती करणे, पथदिव्याचे योग्य रितीने व्यवस्थापन करणे, सिंदेवाही नगराच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी बाल उद्यानाची निर्मिती करणे, युवकांच्या सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम शाळेची निर्मिती करणे. सार्वजनिक समाज मंदिराची दुरुस्ती व सुशोभिकरण करणे, महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून महिला सभागृहाची निर्मिती करणे, बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची व स्पर्धा परीक्षेची सोय उपलब्ध करुन देणे, नगर पंचायत करदात्यांना निशुल्क दुर्घटना विमा योजनेचा लाभ मिळवून देणे, केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर नसलेल्या सर्व गरजू कुटुंबाना आवास योजनेचा लाभ मिळवून देणे, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी ग्रंथालय व वाचनालयाची निर्मिती करणे या उद्दिष्ठाचा वचन नाम्यात समावेश होता. ज्याप्रमाणे नगर पंचायतीने विशेष मालमत्ता कर वसुली मोहिम धडाक्यात राबवून लाखो रुपयांची कर वसुली केली. त्यानुसार नगरात विकासाची कामे सुरु होणे गरजेचे आहे. सर्वप्रथम सिंदेवाही नगराला नियमित पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने कालबाह्य झालेली पाईप लाईन बदलवून नगरात शुद्ध पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंदेवाही नगरातील समस्येकडे लक्ष देवून विकासाची कामे सुरु करावी अशी मागणी आहे. (पालक प्रतिनिधी)
सिंदेवाहीवासीयांना दिलेले आश्वासन पूर्ण करा
By admin | Published: April 01, 2017 1:44 AM