वरोरा: गौतम बुद्धांनी जी संपूर्ण जगाला शिकवण दिली, त्याचा वसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालविला. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन रिपाईचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी मंगळवारी वरोरा येथील रत्नमाला चौकात केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षनिमित्त खा. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात जाती तोडो भारत जोडो समता अभियान अंतर्गत भारत भिम यात्रा आयोजित करण्यात आली आहे. भारत भिम यांत्रा २६ जानेवारीपासून कन्याकुमारी येथून निघाली असून १ मे रोजी मध्यप्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महु येथील जन्मभूमीमध्ये समारोप करण्यात येणार आहे. भारत भिम यात्रेचे वरोरा शहरातील रत्नमाला चौकात रिपाई ए गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. सध्या भारतात काही जातीय शक्ती डोकेवर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याकरिता नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. आजही जाती धर्माच्या नावावर संघर्ष निर्माण होत आहे. आजही जाती प्रथा देशात पाळण्यात येत आहे. ते मिटविण्याचे आवाहन खा. आठवले यांनी केले. भारत भीम यात्रेला सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. यावेळी रिपाई (ए) तालुका अध्यक्ष बंडू लभाने, विनोद वानखेडे, सुनिल गायकवाड, दर्शन वाघमारे, अतुल वानखडे, धर्मा जीवने, मेघा लिहितकर, रुपा तांबे, वनिता बारसागडे, सुमन भगत, सुरेश मेश्राम, बापू रामटेके आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करा : रामदास आठवले
By admin | Published: April 28, 2016 12:45 AM